केरळा ब्लास्टरच्या खेळाडूची भरपाई वेळेतील जादू

सुनील छेत्री, सुब्राता पॉल, रॉबिन सिंग आणि इयुगेनसन लिंगडोह या भारतीय फुटबॉल विश्वातील दिग्गज मंडळींचा इंडियन सुपर लीगमध्ये (आयएसएल) सहभाग असताना केरळा ब्लास्टरचा एक खेळाडू सर्वाचे लक्ष वेधून घेत आहे. दोन आय-लीग आणि एक फेडरेशन चषक नावावर असलेल्या २८ वर्षीय सी. के. विनीतने यंदाच्या मोसमात दोन सामन्यांत तीन महत्त्वपूर्ण गोल करून केरळला उपांत्य फेरीच्या शर्यतीत आणले. विशेष म्हणजे त्याने हे तिन्ही गोल अखेरच्या क्षणाला केले. केरळचे प्रशिक्षक स्टीव्ह कोपेल यांनीही त्याचे तोंडभरून कौतुक केले आहे.

केरळमधील कन्नूर येथे जन्मलेल्या विनीतचे विश्व फुटबॉलपर्यंत मर्यादित आहे. तो म्हणतो, ‘‘एएफसी आणि आयएसएल यामध्ये मी कुठे खेळतोय हे महत्त्वाचे नाही. मला फक्त फुटबॉल खेळायचे आहे आणि त्यातच मला समाधान मिळते. फुटबॉल खेळताना डोक्यात कोणताही विचार घोंगावत नाही. केवळ आणि केवळ खेळण्याचा आनंद लुटायचा असतो. काही वेळा मी योगदान देण्यात यशस्वी होतो; काही वेळा नाही.’’

एएफसी चषक स्पध्रेत बंगळुरू एफसीचे प्रतिनिधित्व करणाऱ्या विनीतने केरळच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला आहे. त्याने संघाला एफसी गोवाविरुद्ध भरपाई वेळेत गोल करून २-१ असा, तर गतविजेत्या चेन्नईयन एफसीविरुद्ध अखेरच्या पाच मिनिटांत दोन गोल करून ३-१ असा विजय मिळवून दिला. या विजयी वाटचालीत परदेशी खेळाडूंच्या मार्गदर्शनाचाही मोलाचा वाटा असल्याचे विनीत सांगतो. ‘‘परदेशी खेळाडूंकडून आम्हाला विविध बाबी शिकता येतात. ते खूप मोठे खेळाडू आहेत आणि त्यांच्याकडून बरेच काही शिकण्यासारखे आहे. त्यांच्या शैलीपासून ते आहारापर्यंत, अगदी सर्व. पण मला आवश्यक असलेल्या बाबीच त्यांच्याकडून मी आत्मसात करतो. माझ्याकडून झालेल्या चुका ते समजावून सांगतात,’’ असे विनीत म्हणाला.

छेत्री, लिंगडोह यांच्यापेक्षा तुझीच चर्चा अधिक आहे, या प्रश्नावर विनीत थोडा आनंदित झाला; परंतु त्वरित त्याने असे काही नसल्याचा खुलासाही केला. तो म्हणाला, ‘‘मला विशेष असल्यासारखे वाटत नाही. मला केवळ फुटबॉल खेळायचे आहे. त्यामुळे माझ्यावर कोणाचे लक्ष आहे किंवा नाही, याची चिंता नाही. फुटबॉलच्या वाटचालीत अनेक संस्मरणीच अनुभव वाटय़ाला आले. त्यात कटू आणि गोड अनुभवांचाही समावेश आहे. हा प्रवास मला अविरत सुरू ठेवायचा आहे. त्यातच खरा आनंद आहे.’’