भारताच्या आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्याआधीच दोन्ही देशांच्या क्रिकेट बोर्डांमध्ये चांगलीच जुंपली आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारतीय संघाने अॅडीलेड येथे दिवस-रात्र कसोटी सामना खेळण्यास नकार दर्शवल्यामुळे, क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे प्रमुख जेम्स सदरलँड नाराज आहेत. ऑस्ट्रेलियातील स्थानिक रेडीओ चॅनलला दिलेल्या मुलाखतीत सदरलँड यांनी, यजमान देशाला कसोटी सामना कसा खेळवायचा याचा अधिकार असायला हवा असं सूचक वक्तव्य केलं आहे. यापुढे जात सदरलँड यांनी, भारताला दिवस-रात्र कसोटी क्रिकेट जगवण्याऐवजी मालिका जिंकण अधिक महत्वाचं असल्याचंही म्हटलं आहे.
अवश्य वाचा – दिवस-रात्र कसोटीसाठी थोडं थांबा; भारतीय संघाचा प्रशासकीय समितीला सल्ला
“भारतीय संघाला ऑस्ट्रेलियात येऊन आम्हाला हरवायचं आहे. आतापर्यंत ऑस्ट्रेलियात झालेल्या दिवस-रात्र कसोटी सामन्यांमध्ये गुलाबी चेंडूवर आमचा संघ यशस्वी झालेला आहे. त्यामुळे गुलाबी चेंडूवर क्रिकेट खेळल्यास ऑस्ट्रेलियाला फायदा होईल हा विचार मनात घेऊन बीसीसीआय दिवस-रात्र कसोटी सामना खेळण्यास नकार देत आहे.” रेडीओ स्टेशनला दिलेल्या मुलाखतीत सदरलँड बोलत होते. २१ नोव्हेंबर ते १९ जानेवारीदरम्यान भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार असून, या दौऱ्यात भारतीय संघ ३ टी-२०, ४ कसोटी आणि ३ वन-डे सामने खेळणार आहे.
अवश्य वाचा – भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याचं वेळापत्रक जाहीर
सदरलँड यांनी आरोपांना उत्तर देताना बीसीसआयच्या अधिकाऱ्यांनी, एखाद्या संघाने ऑस्ट्रेलियात येऊन विजय मिळवण्याचं ध्येय ठेवलं तर त्यात वावगं काय?? बीसीसीआयवर स्थापन करण्यात आलेल्या क्रिकेट प्रशासकीय समितीचे प्रमुख विनोद राय यांनीही दिवस-रात्र कसोटी सामन्यावर आपली प्रतिक्रीया व्यक्त केली. “दिवस-रात्र कसोटी सामन्यावर बीसीसीआय आपली भूमिका बदलेल याची आता शक्यता वाटत नाही. याबाबत खेळाडूंनी आणि बोर्डाने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. सध्यातरी या विषयावरुन दोन्ही देशांच्या बोर्डात वाद नाहीयेत. मात्र ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारत दिवस-रात्र कसोटी सामना खेळणार नाही ही गोष्ट नक्की आहे.”
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on May 2, 2018 8:24 pm