बीसीसीआयच्या क्रिकेट सल्लागार समितीचा सदस्य आणि भारताचा माजी क्रिकेटपटू व्ही. व्ही. एस. लक्ष्मणने काही वर्षांपूर्वी गाजलेल्या विराट कोहली-अनिल कुंबळे वादाला पुन्हा एकदा तोंड फोडलं आहे. अनिल कुंबळेनी प्रशिक्षक म्हणून कायम रहावं अशी आमची इच्छा होती (सौरव गांगुली, सचिन तेंडुलकर आणि लक्ष्मण यांच्या समितीची). मात्र कोहलीसोबत झालेल्या वादानंतर कुंबळेनेच राजीनामा देणं पसंत केलं. इंडिया टुडे वाहिनीच्या कार्यक्रमात बोलत असताना लक्ष्मणने हा खुलासा केला आहे.

“त्या वादामध्ये कोहलीने आपली सीमा ओलांडली असं मला अजिबात वाटत नाही. सल्लागार समितीला अनिल कुंबळेनी प्रशिक्षकपदी कायम रहावं असं वाटतं होतं, मात्र त्याने राजीनामा देण्याचा निर्णय पक्का केला होता. सल्लागार समितीमध्ये मला, सौरव गांगुली आणि सचिन तेंडुलकर यांना योग्य प्रशिक्षक निवडण्याची जबाबदारी देण्यात आली होती. वाद सोडवणं हे आमचं काम नव्हतं. तरीही कुंबळे-कोहली वादामध्ये आम्ही मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यामध्ये आम्हाला यश आलं नाही.” लक्ष्मणने क्रिकेट सल्लागार समितीची भूमिका स्पष्ट केली.

२०१७ साली झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीत भारताला अंतिम फेरीत पाकिस्तानकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. यानंतर विराट कोहली आणि अनिल कुंबळे यांच्यात बेबनाव वाढल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. अनिल कुंबळेच्या कार्यपद्धतीवर कोहली आणि काही खेळाडू खूश नसल्यामुळे बीसीसीआयने रवी शास्त्री यांच्यावर प्रशिक्षणाची जबाबदारी सोपवली होती. या प्रकरणात अनिल कुंबळेला ज्या पद्धतीने राजीनामा द्यायला लागला होता, त्यावरुन विराट कोहलीला क्रिकेट प्रेमींच्या रोषाचा सामना करावा लागला होता.