‘‘मी खोटे बोललो.. आणि मला माफ करा,’’ असा माफीनामा ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर कॅमेरून बँक्रॉफ्टने जाहीरपणे मांडला. बँक्रॉफ्टवर प्रत्यक्ष कार्यवाहीची जबाबदारी सोपवण्यात आली होती. मात्र टीव्ही कॅमेऱ्याने रंगेहाथ पकडल्यामुळे हे प्रकरण जगासमोर आले. बँक्रॉफ्टवर नऊ महिन्यांची बंदी घालण्यात आली आहे.

‘‘मी अतिशय निराश झालो आहे. माझ्या कृतीची मला अतिशय खंत वाटते आहे. या प्रकरणाचा मला आयुष्यभर पश्चात्ताप वाटणार आहे. त्यामुळेच मी माफी मागतो. उर्वरित आयुष्यात समाजासाठी काही तरी चांगले कार्य करण्याची माझी इच्छा आहे,’’ असे बँक्रॉफ्टने सांगितले.

२५ वर्षीय बँक्रॉफ्टने सुरुवातीला आरोप नाकारले होते. या प्रकरणाचा संपूर्णत: पर्दाफाश झाल्यानंतर आता मात्र तो दिलगिरी प्रकट करीत आहे.

‘‘सॅण्ड पेपर वापरला, असे खोटे मी बोललो. त्या घटनेनंतर मी अत्यंत घाबरलो होतो. मला माफ करा. माझ्या चुकीमुळे ऑस्ट्रेलियाच्या नागरिकांचा विश्वास मी गमावला आहे,’’ असे बँक्रॉफ्टने सांगितले.

‘‘संघातील माझे स्थान मला मोकळे करावे लागत आहे, या घटनेमुळे मी अतिशय खचलो आहे. माझ्या कारकीर्दीतील या स्थानापर्यंत पोहोचण्यासाठी मी अत्यंत मेहनत घेतली होती,’’ असे बँक्रॉफ्टने सांगितले.