महेंद्रसिंह धोनीने भारतीय संघाचं कर्णधारपद सोडल्यानंतर विराट कोहलीकडे संघाचं नेतृत्व सोपवण्यात आलं. फार कमी कालावधीत विराटने भारतीय संघाला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अव्वल स्थानी पोहचवलं आहे. कर्णधारपदाची जबाबदारी आल्यानंतरही विराटच्या फलंदाजीचा फॉर्म अजुनही कायम आहे. आतापर्यंत झालेल्या प्रत्येक मालिकेत विराटने आश्वासक फलंदाजी करत खोऱ्याने धावा वसूल केल्या आहेत. मैदानातही विराटची एक आक्रमक कर्णधार म्हणून ओळख आहे. त्याच्या या कामगिरीवर खुश झालेल्या माजी खेळाडू कृष्णमचारी श्रीकांत यांनी विराटची तुलना कपिल देव यांच्याशी केली आहे.

“मी कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघात खेळलो आहे, मी विराटची तुलना कपिल देव यांच्याशी करतो. त्याच्यात प्रचंड आत्मविश्वास आहे.” Star Sports वाहिनीच्या कार्यक्रमात बोलत असताता श्रीकांत यांनी विराटचं कौतुक केलं. आतापर्यंत विराट कोहलीच्या नावावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २७ कसोटी शतकं तर ४३ वन-डे शतकं जमा आहेत. नुकत्यात पार पडलेल्या न्यूझीलंड दौऱ्यात विराटला त्याच्या लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नव्हती. या मालिकेनंतर करोना विषाणूमुळे संपूर्ण देशभरातील स्पर्धा अनिश्चित काळासाठी रद्द केल्या आहेत.

नुकत्याच पार पडलेल्या न्यूझीलंड दौऱ्यात विराटला त्याच्या लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नव्हती

 

याच कार्यक्रमात बोलत असताना श्रीकांत यांनी धोनीच्या निवृत्तीविषयी भाष्य केली. “मी उगाच वेगळं काही उत्तर देणार नाही. मी सध्या निवड समितीवर असतो तर मी काय केलं असतं यावर मी बोलेन. यंदाचं आयपीएल झालं नाही तर धोनीला टी-२० विश्वचषक संघात संधी मिळण्याची शक्यता कमीच आहे. लोकेश राहुल यष्टीरक्षक-फलंदाज म्हणून काम पाहू शकतो. ऋषभ पंतबद्दल मला अजुनही थोडीशी शंका आहे, पण तो गुणवान खेळाडू आहे यात काहीच शंका नाही.”