भारताचे माजी विकेटकीपर-बॅट्समन फारुख इंजीनियर यांनी कर्णधार विराट कोहली आणि भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवि शास्त्री यांची पाठराखण केलीय. कोहली आणि शास्त्री पुस्तक प्रकाशानाला गेल्यामुळे त्यांना जबाबदार धरता येणार नाही असं इंजीनियर म्हणाले आहेत.  मँचेस्टरमध्ये कसोटी रद्द झाल्यापासून शास्त्री आणि कोहलीवर टीकेचा भडीमार होत असून त्याचसंदर्भात इंजीनियर यांनी भाष्य केलं आहे. शास्त्री यांच्या ‘स्टारगेजिंग: द प्लेयर्स इन माई लाइफ’ या पुस्तकाचं प्रकाशन ओव्हलमधील कसोटी सुरु होण्याच्या दोन दिवस आधी म्हणजेच ३१ ऑगस्ट रोजी प्रकाशित करण्यात आलेलं. लंडनमधील एका हॉटेलमध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला जिथे शास्त्री आणि कोहली यांच्याबरोबर भारतीय सपोर्टींग स्टाफमधील बरेच जण उपस्थित होते. याच कसोटीदरम्यान नंतर शास्त्री करोना पॉझिटीव्ह आढळून आले आणि नंतर सपोर्टींग स्टाफमधील इतरांनाही करोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं होतं.

नक्की वाचा >> शास्त्री गुरुजी अन् धोनीही संघाची साथ सोडणार; विराटही देणार मोठा धक्का, टीम इंडियाचं कसं होणार?

इंजीनियर यांनी स्पोर्ट्स तकला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये या सर्व घटनाक्रमासाठी कोहली आणि शास्त्री यांना दोषी ठरवता येणार नाही असं म्हटलंय. “लोक यासाठी रवि शास्त्रींना जबाबदार ठरवत आहेत. त्यांनी भारतीय क्रिकेटमध्ये चमत्कार घडवला आहे. रवि आणि विराट या दोघांनाही संघासाठी फार उत्तम कामगिरी केलीय. तुम्ही त्यांना केवळ पुस्तक प्रकाशन सोहळ्याला जाण्यासाठी दोषी ठरवू शकत नाही. ते तांत्रिक दृष्ट्या हॉटेलच्या बाहेर गेले नव्हते ते हॉटेलमध्येच होते. एखाद्याला दोष देणं फार सोप्प असतं,” असा टोला इंजीनियर यांनी टीकाकारांना लगवालाय.

नक्की वाचा >> Ind vs Eng : “त्या गुन्ह्यासाठी रवी शास्त्री आणि कोहलीला अटक करा”; संतप्त भारतीयांची मागणी

‘आयसीसी’ जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा संपल्यानंतर इंग्लंडविरुद्धची पहिली कसोटी सुरू होण्यास अवधी असताना ऋषभ पंतला करोनाची लागण झाली होती. त्यावेळी ‘बीसीसीआय’चे सचिव जय शाह यांनी भारतीय संघातील खेळाडूंना सार्वजनिक कार्यक्रमांना हजेरी न लावण्याचे निर्देश दिले होते. असं असतानाही रवी शास्त्री संघ सहकाऱ्यांसोबत पुस्तक प्रकाशनाच्या सार्वजनिक कार्यक्रमाला उपस्थित होते. या कार्यक्रमानंतर रवि शास्त्रींसोबत असणारे गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण, क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर. श्रीधर यांच्या चाचणीचे अहवालसुद्धा सकारात्मक आले, तर त्यांच्या संपर्कातील नितीन पटेल यांना विलगीकरणात ठेवण्यात आलं होतं. या कार्यक्रमाच्या पाचव्या दिवशीच शास्त्री यांना लागण झाल्याचं स्पष्ट झालं होतं. त्यामुळे शास्त्री यांना याच कार्यक्रमादरम्यान संसर्ग झाल्याचा दावा केला जातोय.

नक्की वाचा >> “IPL साठी विराट असं करणं शक्यच नाही”; सामना रद्द झाल्यानंतर त्या एका शब्दामुळे इंग्लंड क्रिकेट बोर्डावर संतापले भारतीय चाहते

इंजीनियर यांनी, “लोक सेल्फी घेण्यासाठी आमच्या आजूबाजूला येत असतात आणि प्रत्येक वेळेस तुम्ही नाही म्हणू शकत नाही. रवि आणि विराटसोबत असं काहीसं झालं असणार किंवा त्यांनी लोकांसोबत हस्तांदोलन केलं असणार. पण कोण करोना पॉझिटिव्ह होतं हे कसं कळणार? त्यामुळेच यासाठी आपण रवि किंवा विराट कोहलीला दोष देऊ शकत नाही. माझ्यामध्ये त्यांच्यावर फार आरोप करण्यात आले,” असं म्हणत भारतीय कर्णधार आणि प्रशिक्षकांची बाजू घेतली.

पाचवी कसोटी रद्द करण्यासंदर्भात वेगवेगळ्या बातम्या समोर येत असल्याचं सांगताना भारताने पाचवी कसोटी न खेळण्याचा निर्णय घेतला असेल तर ते दूर्देवी आहे असं इंजीनियर यांनी म्हटलं आहे. इतकच नाही तर भारताकडे मालिका ३-१ ने जिंकण्याची संधी होती. मात्र आता असं होणार नाहीय, याबद्दल इंजीनियर यांनी खंत व्यक्त केली.

लंडनमध्ये गेल्या आठवडय़ात पुस्तक प्रकाशनाच्या सार्वजनिक कार्यक्रमाला रवी शास्त्री आणि विराट कोहलीने आपल्या काही सहकाऱ्यांसोबत हजेरी लावली होती. समोर आलेल्या माहितीनुसार या कार्यक्रमाला बरीच गर्दी झाली होती. यावेळेस रवी शास्त्री, विराट कोहली आणि अन्य भारतीय खेळाडूंने मास्कही घातलं नव्हतं. या कार्यक्रमाला बाहेरुनही अनेकजण आले होते. त्यानंतर ओव्हल कसोटीदरम्यान रवी शास्त्री यांना करोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं. लंडनमधील हॉटेलमध्ये झालेल्या शास्त्री यांच्या पुस्तक प्रकाशनाच्या सार्वजनिक कार्यक्रमाला कोहलीसह या मार्गदर्शकांनी उपस्थिती असल्याने चाहत्यांनी पाचवी कसोटी रद्द झाल्यानंतर नाराजी व्यक्त करताना या दोघांवर टीका केलेली. अगदी पुस्तक प्रकाशनाला जाऊन कसोटी रद्द करण्याची वेळ आणणाऱ्या कोहली आणि शास्त्री यांना अटक करा अशीही मागणी काही चाहत्यांनी केली होती.