करोनाच्या भीतीमुळे फॉर्म्युला-वनच्या अनेक शर्यती रद्द करण्यात आल्या असून काही पुढे ढकलण्यात आल्या आहेत. यामुळे यंदा सर्व शर्यती होणे शक्य नसल्यामुळे फॉर्म्युला-वन अजिंक्यपद स्पर्धा म्हणजेच फॉर्म्युला-वनचा संपूर्ण हंगाम रद्द करण्याची मागणी फॉर्म्युला-वन समूहाचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी बर्नी एस्सेलस्टोन यांनी केली आहे.

२०२०च्या मोसमातील दोन शर्यती रद्द करण्यात आल्या असून सहा शर्यती पुढे ढकलण्यात आल्या आहेत. उर्वरित १४ शर्यतींबाबत प्रश्नचिन्ह कायम आहे. करोनामुळे या शर्यतीही होतील की नाही, याबाबत आताच काही बोलणे कठीण आहे. अजिंक्यपदाची स्पर्धा होण्यासाठी किमान आठ शर्यती होणे आवश्यक आहे. मात्र त्याही होणे अशक्य असल्याचे मत एस्सेलस्टोन यांनी व्यक्त के ले आहे.

८९ वर्षीय एस्सेलस्टोन म्हणाले, ‘‘यावर्षीची अजिंक्यपद स्पर्धा येथेच रद्द करा आणि पुढील वर्षी नव्याने सुरुवात करा. या वर्षी अजिंक्यपदासाठी पुरेशा शर्यती होतील, असे मला वाटत नाही. अजिंक्यपदासाठी लागणाऱ्या आठ शर्यतीही होणे कठीण दिसत आहे.’’

मॅकलॅरेनच्या लुइस हॅमिल्टन याला मायके ल शूमाकर याचा सात अजिंक्यपदाचा विक्रम मोडीत काढण्याची संधी या वर्षी आहे. मात्र हॅमिल्टनला त्यासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे. याविषयी एस्सेलस्टोन म्हणाले, ‘‘यंदाचा मोसम रद्द  केला तरी हॅमिल्टनला काहीही फरक पडणार नाही. हॅमिल्टन हा २०पैकी कितीही शर्यती जिंकू  शकतो. जागतिक अजिंक्यपद स्पर्धा झाली तर हॅमिल्टन हा सर्वाधिक विश्वविजेतेपदाचा विक्रम आपल्या नावावर करू शकतो. हॅमिल्टनमध्ये तशी क्षमता आहे. यंदाचा मोसम झाला तरी आठही शर्यती हॅमिल्टन जिंकू  शकतो.’’