शतकाहून जुन्या असलेल्या मोहन बागान क्लबला जीवदान देत अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने (एआयएफएफ) या क्लबवर असलेली दोन वर्षांची बंदी उठवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र मोहन बागान क्लबला दोन कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
डिसेंबर महिन्यात झालेल्या आय-लीग फुटबॉल स्पर्धेतील ईस्ट बंगालविरुद्धच्या सामन्यात गोंधळ घातल्याप्रकरणी काही दिवसांपूर्वी एआयएफएफने मोहन बागानवर दोन वर्षांसाठी बंदी घातली होती. मात्र बंदी उठवण्याचा निर्णय मंगळवारी एआयएफएफच्या कार्यकारी समितीच्या बैठकीत घेण्यात आला.
‘‘मोहन बागानला अभय देत त्यांना आय-लीग स्पर्धेत यापुढे सहभागी होण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र या मोसमात आतापर्यंत मोहन बागानने कमावलेले १२ गुण त्यांनी गमावले आहेत. त्यांना शून्यापासून सुरुवात करावी लागणार असून दोन कोटी रुपयांचा भरुदडही सहन करावा लागणार आहे. गुंतवणूकदार, चाहते आणि खेळाडूंच्या हिताच्या दृष्टीने हा निर्णय घेतला आहे,’’ असे एआयएफएफचे अध्यक्ष प्रफुल पटेल यांनी सांगितले.