रणजी करंडक स्पर्धेच्या २०१९-२० या हंगामात बंगाल आणि सौराष्ट्र या दोन संघांनी अंतिम फेरीत प्रवेश मिळवला आहे. बंगालने घरच्या मैदानावर कर्नाटकचं आव्हान परतवून लावलं, तर सौराष्ट्राने गुजरातवर मात केली. मात्र या दोन्ही संघांमध्ये बंगालचा अंतिम फेरीपर्यंत पोहचण्याचा प्रवास हा अधिक रंजक आहे. बंगालला अंतिम फेरीत पोहचवण्यात प्रशिक्षक अरुण लाल यांचा मोलाचा वाटा आहे. गेल्या काही वर्षांपासून संघाची केलेली बांधणी आणि अथक मेहनतीच्या जोरावर आज बंगालला हे यश मिळालं आहे.

अरुणलाल (त्यांना आदराने लालजी म्हणतात) यांच्या प्रशिक्षणाचा बंगालच्या यशस्वी कामगिरीत निश्चितच सिंहाचा वाटा आहे. अरुणलाल माजी कसोटीपटू मूळचा दिल्लीकर! सेंट स्टीफन्स कॉलेजचा विद्यार्थी, दिल्लीत बिशन बेदीच्या तालमीत तयार झालेल्या अरुणलालची करडी शिस्त आणि घामटा काढणाऱ्या प्रशिक्षण पद्धतीला नाकं मुरडण्यात आली. त्यांच्या या कडक स्वभावामुळे ते टीकेचे धनीही बनले. मध्यंतरीच्या काळात अरुणलाल यांना कॅन्सरचा आजार झाला. मात्र मुळातच लढवय्या स्वभावाचे असलेल्या अरुण लाल यांनी यावरही यशस्वी मात करत बंगालच्या प्रशिक्षणाची धुरा सांभाळली. आपल्या करड्या शिस्तीत लालजींनी बंगाली खेळाडूंना चांगलंच तयार केलं आहे.

अरुण लाल यांनी बंगालच्या संघासाठी व्हिजन २०२० कार्यक्रमाची आखणी केली. बंगाल क्रिकेट असोसिएशनने मोसमाला सुरवात होण्याआधीच प्रशिक्षण शिबिराची आखणी केली. खेळाडूंच्या फिटनेसवर भर देताना अनफिट तसेच बेशिस्त खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखवला. अशोक दिंडासारख्या अनुभवी खेळाडूला बेशिस्तीची किंमत मोजावी लागली. दिंडाची उणीव बंगालला जाणवली नाही. इशान पोरेल, आकाशदीप, मुकेशकुमार या तेज त्रिकुटाने ८२ मोहरे टिपून अरुणलाल यांचा विश्वास सार्थ ठरवला.

अरुणलाल यांनी मुकेश कुमारला दिलासा देताना त्याची कामगिरी कशी उंचावेल यावर भर दिला. मुकेश कुमारचे वडील काशिनाथ यांचे निधन झाल्यावर त्याला जबरदस्त धक्का बसला. “वडिलांच्या निधनामुळे अपरिमीत नुकसान झाले ही बाब खरीच…पण घरी बसून शोक करत बस किंवा मैदानात उतरुन चांगली कामगिरी कर आणि त्यांना श्रद्धांजली देण्याचा प्रयत्न कर.” वरकरणी अरुण लाल यांचा हा सल्ला कोणालाही कठोर वाटू शकतो, मात्र एखाद्या खेळाडूकडून त्याची सर्वोत्तम कामगिरी काढून घेण्यासाठी प्रशिक्षकाला काहीवेळा कठोरही व्हावं लागतं हे अरुण लाल यांनी यावेळी दाखवून दिलं. मुकेशनेही कर्नाटकाविरुद्ध सामन्यात ८ बळी टिपून आपली कामगिरी चोखपणे पार पाडली.

अंतिम फेरीत बंगाल विरुद्ध सौराष्ट्र यांच्यातील लढत राजकोट येथे ९ मार्चपासून रंगेल. सौराष्ट्रचे प्रशिक्षक आहेत करसन घावरी उर्फ कडूभाई ! घावरी हे भारताचे डावखुरे द्रुतगती गोलंदाज तर अरुणलाल हे भारताचे सलामीवीर. पाकिस्तान, वेस्ट इंडिज या देशांचे दौरे ८० च्या दशकात अरुणलाल यांनी केले. सुनील गावसकर बरोबर त्यांनी सलामीवीराची भूमिका पार पाडली. श्रीलंकेविरुद्ध मद्रासमध्ये त्याने कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. पाकिस्तान दौऱ्यात (८२-८३) लाहोर कसोटीत गावसकर-अरुण लाल यांनी इम्रान, सर्फराज नवाझ यांना सामोरं जात शतकी सलामी देताना अर्धशतक झळकावलं होतं.

कराची कसोटीत अरुण लालने ३५ धावांची खेळी केली, पण पुढच्याच फैसलाबाद कसोटीतील (०, ३) अपयशामुळे त्याला वगळण्यात आलं. ५ वर्षानंतर पाकिस्तान विरुद्ध इडन गार्डन्स कोलकाता कसोटीत पुनरागमन करताना त्याने दोन्ही डावात अर्धशतकं साजरी केली. या कसोटीत सुनील गावसकर खेळला नव्हता. गावसकर आल्यावर अरुण लालला संघाबाहेर जावं लागलं. सुनील गावसकरच्या निवृत्तीनंतर अरुण लालने संघात पुनरागमन केलं ते विंडीजविरुद्ध च्या मालिकेत…८७-८८ च्या मोसमात इडन गार्डन्सवर घरच्या प्रेक्षकांसमोर खेळताना अरुणलालने वॉल्श, पॅटरसन, डेव्हिस यांच्या माऱ्याला सामोरं जात ९३ धावा केल्या, हीच त्याची सर्वोच्च धावसंख्या !

१६ कसोटीत २६ च्या सरासरीने ७२९ धावा करणारा अरुण लाल आपल्या ७ वर्षांच्या कारकिर्दीत खेळला. बंगालकडून अरुणलालने दशकभर रणजी स्पर्धेत धावांच्या राशी उभारल्या. त्याआधी दिल्लीकडून तो रणजीत खेळला. ५ हजार धावा त्याने रणजीत केल्या त्या १६ शतकांसह. २८७ धावा ही त्याची रणजीतील सर्वोच्च धावसंख्या. ८३ च्या रणजी स्पर्धेत बंगालकडून खेळताना अरुण लालने लागोपाठ चार शतकं झळकावली. बिहारविरुद्घ १०३, आसामविरूद १०३, ओरिसाविरुद्ध १३५ आणि दिल्लीविरुद्व १०५ धावांची खेळी लाल यांनी केली. रणजी विजेत्या बंगाल संघातही अरुणलाल होता. त्यानंतर आता 30 वर्षानंतर रणजी विजेत्या बंगाल संघाचा प्रशिक्षक म्हणून तो राजकोटला यशस्वी होतो का याची उत्सुकता साऱ्या बंगाली लोकांना असेल.