जवळपास १३ महिन्यांच्या कालावधीनंतर फिडे कँडिडेट्स बुद्धिबळ स्पर्धेला (जगज्जेत्यासाठीचा आव्हानवीर) रशियातील येकातेरिनबर्ग येथे प्रारंभ झाला असून नवव्या फेरीअखेर रशियाच्या इयान नेपोमनियाची याने ५.५ गुणांसह आघाडी घेतली आहे.

नेपोमनियाची याने आपल्याच देशाच्या अलेक्झांडर ग्रिशूकविरुद्धचा डाव बरोबरीत सोडवला. आठव्या फेरीत मॅक्सिम वचिएर-लॅग्रेव्हवर थरारक विजय मिळवणाऱ्या अमेरिकेच्या फॅबियानो करुआना याने किरील अलेकसेंको याला बरोबरीत रोखले. या कामगिरीमुळे करुआना पाच गुणांसह दुसऱ्या स्थानी पोहोचला आहे. नेदरलँड्सच्या अनिश गिरीने चीनच्या वँग हाओविरुद्धचा डाव जिंकत पाच गुणांसह तिसरे स्थान प्राप्त केले आहे.

जागतिक अजिंक्यपद स्पर्धेसाठी मॅग्नस कार्लसनचा आव्हानवीर निवडण्यासाठी खेळवण्यात येणारी ही स्पर्धा गेल्या वर्षी मार्च महिन्यात थांबवण्यात आली होती. करोनाच्या पहिल्या लाटेमुळे अर्धवट स्थितीत असलेली ही स्पर्धा आता सुरू झाली असून २७ एप्रिलपर्यंत १४ फेऱ्या रंगणार आहेत.