भारताचा पाच वेळा विश्वविजेता विश्वनाथन आनंदकडे विजेतेपदाची क्षमता अजूनही आहे, याचा प्रत्यय घडवित त्याने व्हेसेलीन टोपालोव्ह याच्यावर मात केली आणि आव्हानवीर बुद्धिबळ स्पर्धेतील नवव्या फेरीअखेर अध्र्या गुणांची आघाडी घेतली. त्याचे आता सहा गुण झाले आहेत.
टोपालोव्ह याला आनंदने विश्वविजेतेपदाच्या लढतीत हरविले होते. त्यामुळे त्याच्याविरुद्धच्या डावाविषयी कमालीची उत्सुकता निर्माण झाली होती. त्याने राजाच्या पुढील प्याद्याच्या साहाय्याने डावाची सुरुवात केली.
दोन्ही खेळाडूंनी सुरेख डावपेच करण्याचा प्रयत्न केला. ३९ व्या चालीस आनंदने एका प्याद्याची आघाडी घेतली व तेथून त्याने डावावर नियंत्रण मिळविले. त्याने प्याद्यांचा कल्पकतेने उपयोग केला व टोपालोव्ह याच्या वजीराच्या हालचालींना फारसा वाव दिला नाही. हळूहळू आपली प्यादी पुढे नेतानाच एकीकडे प्रतिस्पर्धी राजास शह देत डावावरील पकड अधिक घट्ट केली. ५० व्या चालीसच आनंदचा विजय स्पष्ट दिसत होता. अखेर ५७ व्या चालीस टोपालोव्हने पराभव मान्य केला.
अर्मेनियाचा खेळाडू लेव्हॉन आरोनियन याला अझरबैजानच्या शाख्रीयर मामेद्यारोव्ह याच्याकडून पराभवास सामोरे जावे लागले. चुरशीने झालेल्या या लढतीत शाख्रीयर याने ४४ व्या चालीस हा डाव जिंकला. त्याने डावाच्या मध्यास सुरेख डावपेच करीत आरोनियन याचा बचाव निष्फळ ठरविला.
दिमित्री आंद्रेकीन यानेही पीटर स्वेडलर याला बरोबरीत रोखून सनसनाटी कामगिरी केली. स्वेडलर याने आपल्या मोहरांच्या साहाय्याने प्रतिस्पध्र्यावर डाव टाकण्याचा प्रयत्न केला मात्र त्यामध्ये त्याला यश मिळाले नाही. अखेर ३० व्या चालीस दोन्ही खेळाडूंनी बरोबरी स्वीकारली.
सर्जी कार्याकिन याने रंगतदार झालेल्या लढतीत व्लादिमीर क्रामनिक याच्यावर आश्चर्यजनक विजय नोंदविला. त्याने दोन हत्तींच्या साहाय्याने क्रामनिकच्या राजास कोंडीत पकडले. क्रामनिककडे दोन हत्ती असूनही त्याला आपला बचाव राखता आला नाही. कार्याकिन याने आठव्या फेरीत स्वेडलर याला पराभूत केले होते.

गुणतालिका
खेळाडू                    गुण
विश्वनाथन आनंद        ६
लेव्हॉन अरोनियन     ५
व्लादिमिर क्रॅमनिक     ४.५
सर्जी कार्याकिन          ४.५
शाख्रीयार मामेद्यारोव्ह     ४.५
पीटर स्विडलर    ४
दिमित्री आंद्रेकीन    ४
व्हेसेलिन टोपालोव्ह    ३.५

सहाव्या फेरीतील निकाल :
विश्वनाथन आनंद विजयी वि. व्हेसेलिन टोपालोव्ह
शाख्रीयार मामेद्यारोव्ह विजयी वि. लेव्हॉन अरोनियन
पीटर स्विडलर बरोबरी वि. दिमित्री आंद्रेकीन
व्लादिमिर क्रॅमनिक पराभूत वि. सर्जी कार्याकीन

व्हेसेलीन टोपालोव्ह याच्याविरुद्ध मिळविलेल्या विजयामुळे माझा आत्मविश्वास उंचावला आहे. दुसऱ्या टप्प्यात त्याच्यावर मात केल्यामुळे माझ्या विजेतेपदाच्या आशा उंचावल्या आहेत. टोपालोव्ह हा अतिशय धोकादायक खेळाडू आहे. कोणत्याही क्षणी डावास कलाटणी देण्याची क्षमता त्याच्याकडे आहे. तथापि ४० व्या चालीनंतर मी सावधपणे खेळलो, त्यामुळेच हा डाव जिंकू शकलो                                                                                  
  विश्वनाथन आनंद