रशियातील येकाटेरिनबर्ग येथे सुरू असलेली कँडिडेट्स बुद्धिबळ स्पर्धा अर्धवट स्थितीत थांबवण्याचा निर्णय जागतिक बुद्धिबळ महासंघाने (फिडे) घेत सर्वानाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. करोना विषाणूच्या संसर्गामुळे रशियाने देशाबाहेर जाणारी तसेच देशात येणारी सर्व विमाने रद्द करण्याचा निर्णय जाहीर केल्यामुळे संयोजकांनी स्पर्धा महत्त्वपूर्ण टप्प्यावर आली असतानाच ती थांबवण्याचा निर्णय घेतला आहे.

सात फेऱ्यांनंतर ही स्पर्धा रद्द करण्यात आली आहे. आठव्या फेरीला गुरुवारपासून सुरुवात होणार होती. ‘‘रशिया सरकारने २७ मार्चपासून अनिश्चित कालावधीपर्यंत आपल्या देशात कोणतेही परदेशी विमान येणार नाही अथवा आपल्या देशातून कोणतेही विमान उड्डाण घेणार नाही, असा निर्णय जाहीर केला. खेळाडू तसेच पदाधिकाऱ्यांची सुरक्षितता तसेच ते आपल्या घरी सुरक्षित परतू शकतील की नाही, याची कोणताही हमी दिली जात नाही. त्यामुळेच कँडिडेट्स बुद्धिबळ स्पर्धेच्या कलम १.५ नुसार ही रद्द थांबवण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे,’’ असे ‘फिडे’चे अध्यक्ष अर्कादी डोर्कोव्हिच यांनी सांगितले.

जगज्जेत्या मॅग्नस कार्लसनचा आव्हानवीर या स्पर्धेतून निश्चित होणार होता. मात्र आता ही स्पर्धा ज्या परिस्थितीत थांबवण्यात आली आहे, तिथपासूनच सुरू करण्यात येतील. स्पर्धेला सुरुवात होण्याआधीच या नियमांची कल्पना खेळाडूंना देण्यात आली होती. करोनाबाबतची जागतिक स्थिती आटोक्यात आल्यानंतर नव्या तारखा जाहीर करण्यात येतील, असेही डोर्कोव्हिच यांनी सांगितले.

सात फेऱ्यांचा निकाल ग्राह्य़ धरण्यात येईल. आठव्या फेरीपासून पुन्हा स्पर्धेला सुरुवात होईल. सातव्या फेरीअखेर फ्रान्सचा मॅक्सिम वचिएर-लॅग्रेव्ह आणि रशियाचा इयान नेपोमनियाची हे प्रत्येकी ४.५ गुणांसह आघाडीवर आहेत. भारताचा ग्रँडमास्टर आणि पाच वेळचा जगज्जेता विश्वनाथन आनंद हा जर्मनीत अडकला असून या स्पर्धेचे ऑनलाइन समालोचन करत आहे.

करोनामुळे जगभरातील सर्व प्रतिष्ठेच्या स्पर्धा लांबणीवर पडल्या आहेत अथवा रद्द करण्यात आल्या आहेत. त्यात ऑलिम्पिक पात्रता स्पर्धाचा समावेश आहे. काही दिवसांपूर्वीच टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धाही लांबणीवर टाकण्याचा निर्णय आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने (आयओसी) घेतला होता. तरीही कँडिडेट्स बुद्धिबळ स्पर्धा सुरू असल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात होते. मात्र ही स्पर्धा अर्धवट स्थितीत रद्द करून संयोजकांनी सर्वानाच आश्चर्याचा धक्का दिला आहे.