पाकिस्तान संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिरने मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधून अनिश्चित काळासाठी विश्रांती स्विकारली आहे. गेल्या वर्षी आमिरनं कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती स्विकारली होती. आमिर विदेशातील विविध लीगमध्ये खेळत राहणार आहे. मात्र, पाकिस्तान संघासाठी तो अनिश्चित काळासाठी उपलब्ध नसणार आहे. अनिश्चित काळासाठी विश्रांती घेताना २८ वर्षीय आमिरनं पाकिस्तान क्रिकेट बोर्डावर गंभीर आरोपही केले आहेत. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

२०१७ मध्ये पाकिस्तान संघाला चॅम्पियन चषक जिंकून देण्यात मोलाचा वाटा उचलणाऱ्या आमिरनं संघ व्यवस्थापन आणि गोलंदाजी प्रक्षिक्षकावर मानसिक छळ केल्याचा आरोप केला आहे. येथे माझा मानसिक छळ होतोय. आता हे सहन होत नाही. सध्याच्या परिस्थितीत मी पाकिस्तान संघाकडून किक्रिटे खेळू शकत नाही, दोन ते तीन दिवसांमध्ये पाकिस्तानमध्ये गेल्यानंतर बोर्डाशी याबाबत चर्चा करणार आहे, अशी प्रतिक्रिया आमिरनं दिली आहे. मोहम्मद आमिर सध्या श्रीलंकामध्ये आहे. तो श्रीलंका प्रिमियम लीग मध्ये खेळत आहे.


न्यूझीलंड आणि जिम्बाब्वे दौऱ्यासाठी संघात निवड न केल्यामुळे मोहम्मद आमिर पाकिस्तान क्रिकेट बोर्डावर नाराज होता. व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये आमिर म्हणतोय की, ‘मी क्रिकेटपासून दूर जात नाही. पाकिस्तान क्रिकेट मंडळाचं व्यवस्थापन मला क्रिकेटपासून दूर करण्याचा प्रयत्न करत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये माझा मानसिक छळ केला जातोय. २०१० ते २०१५ यादरम्यान मानसिक छळही सोसले आहेत. यादरम्यान मला क्रिकेटपासून दूरही जावं लागलं. आता हे सहन होत नाही.