अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे २४ आणि २५ फेब्रुवारी दरम्यान भारत दौऱ्यावर आले होते. डोनाल्ड ट्रम्प त्यांची पत्नी मलेनिया आणि मुलगी इव्हान्का यांच्यासोबत या दौऱ्यावर आले होते. या दौऱ्याच्या पहिल्या दिवशी ते अहमदाबादला उतरले आणि मोटेरा स्टेडियममध्ये त्यांनी एका कार्यक्रमात भाषण केले. या भाषणा दरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून भारतीय क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली यांच्या नावांचा उच्चार थोडासा चुकला. त्यावरून ट्रम्प यांना प्रचंड ट्रोल करण्यात आले. त्यातच भर म्हणून इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉन याने एक ट्विट करून त्यांची खिल्ली उडवली.

“डोनाल्ड ट्रम्प कधी एकदा पाकिस्तानचा दौरा करतात आणि क्रिकेटपटू फखर झमानच्या नावाचा उच्चार करतात याचीच मला उत्सुकता लागून राहिली आहे”, असे ट्विट मायकल वॉनने केले.

तसेच, “सु चीन तू कसा आहेस?”, असा उपहासात्मक प्रश्न त्याने डोनाल्ड ट्रम्प यांच्या भाषणाबाबत केला आणि त्या ट्विटमध्ये #DonaldTrumpIndiaVisit हा हॅशटॅग देखील वापरला.

आपल्या भाषणात ट्रम्प यांनी मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली यांचे तोंडभरून कौतुक केले. दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली यांची नावं आली की जगभरात जल्लोष केला जातो” अशा शब्दात ट्रम्प यांनी त्यांचं कौतुक केले. पण हे करत असताना सचिनच्या नावाचा उल्लेख सूचिन असा केला. हाच धागा पकडत आयसीसीने देखील ट्रम्पला ट्रोल केलं होतं.

याशिवाय, इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू केव्हिन पीटरसन यानेही या मुद्द्यावरून डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली आहे.