पाकिस्तानविरुद्धची मालिका गमावल्यावर तिसरा सामना खेळण्यासाठी धोनी फिरोझशाह कोटलावर आला असला तरी त्याच्या चेहऱ्यावर जास्त दडपण जाणवत नव्हते. क्षेत्ररक्षणाच्या सरावादरम्यान त्याला दुखापत झाली, तरी चेहऱ्यावर स्मितहास्य ठेवत तो नेट्समध्ये आला. फलंदाजीचा सराव करतानाही त्याने सुरेश रैना आणि रवींद्र जडेजा यांच्याबरोबर काही विनोद केले. त्यानंतर पत्रकार परिषदेला आल्यावर आपण कदाचित सामन्यात खेळणार नाही, हे सांगताना त्याच्या चेहऱ्यावर कोणतेच दडपण नव्हते. पत्रकारांच्या प्रश्नांनाही त्याने सहजपणे उत्तरे दिली. पत्रकार परिषदेमध्ये सातत्याने होणाऱ्या टीकेबद्दल त्याला विचारल्यावर तो म्हणाला की, ‘अगर मे उन पर ध्यान देता तो तुटके बिखर चुका होता,’ असे मिस्कील उत्तर दिले.
पत्रकार परिषद झाल्यावर धोनी संघाच्या बसमधून हॉटेलवर गेला नाही. पत्रकार परिषद आटोपल्यावर तो त्याच्या ओळखीच्या एका माणसाबरोबर स्टेडियमच्या एका दरवाज्यापाशी आला. त्या वेळी फक्त एकच पोलीस त्याच्याबरोबर होता. या वेळी धोनी बराच वेळ स्टेडियमच्या दरवाज्यावर आरामात उभा होता. त्यानंतर एक ‘ऑडी’ गाडी आली आणि त्यामध्ये बसून तो निघून गेला. दोन सामने, तेही पाकिस्तानविरुद्ध पराभूत झाल्याची चिंता किंवा दडपण धोनीच्या चेहऱ्यावर दिवसभरात जाणवले नाही. तिसऱ्या सामन्यात तो खेळेल न खेळेल, हे सध्या तरी धोनीला माहिती असेल, पण धोनी दिवसभर आपल्या ‘कॅप्टन कूल’ प्रतिमेला साजेसाच वागला.