Asia Cup 2018 : आशिया चषकात भारत विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यातील सामन्यात कर्णधार रोहित शर्मा याला विश्रांती देण्यात आली. तसेच या स्पर्धेसाठी नियमित कर्णधार विराट कोहली यालाही विश्रांती देण्यात आली आहे. त्यामुळे भारतीय क्रिकेटरसिकांना तब्बल २३ महिन्यांनंतर आपल्या ‘कॅप्टन कूल’ धोनीला संघाचे नेतृत्व करताना पाहायला मिळाले. विशेष म्हणजे धोनीचा कर्णधार म्हणून हा २००वा वनडे सामना होता. हा पराक्रम करणारा तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील तिसरा क्रिकेटपटू ठरला.

सर्वाधिक वनडे सामन्यांत संघाचे नेतृत्व करण्याचा विक्रम ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंगच्या नावावर आहे. त्याने २३० सामन्यांत ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व केले. त्यातील १६५ सामने ऑस्ट्रेलियाने जिंकले. त्यानंतर स्टीफन फ्लेमिंगने २१८ सामन्यांत न्यूझीलंड संघाचे नेतृत्व केले असून त्यातील ९८ सामन्यांत न्यूझीलंडला विजय मिळाला. या ‘२०० क्लब’मध्ये धोनीचे नावही दाखल झाले.

पण हा सामना जिकंण्यात धोनी आणिधोनीसेनेला अपयश आले. सामना अगदी शेवटच्या षटकापर्यंत गेला. पण अंतिम क्षणी जडेजा हाराकिरी करत झेलबाद झाला आणि धोनीला आपल्या या खास सामन्यात विजयश्री मिळवता आली नाही. याच सामन्यात आणखी एक गोष्ट म्हणजे धोनीला नाणेफेकदेखील जिंकता आली नाही. त्यामुळे भारताला प्रथम गोलंदाजी करावी लागली. नाणेफेक जिंती नसली तरी धोनी कर्णधारपदाला साजेशी खेळी करेल आणि आपल्या ‘स्टाईल’मध्ये विजयी फटका मारून भारताला विजय मिळवून देईल, अशी चाहत्यांना आशा होती. पण ही आशादेखील फोल ठरली. धोनीला जावेद अहमदीने स्वस्तात तंबूत धाडले. धोनीने केवळ ८ धावा केल्या.