विदर्भाच्या संघाने सलग दुसऱ्या वर्षी इराणी चषकावर नाव कोरले आहे. वासिम जाफर आणि उमेश यादव यांच्या अनुपस्थितीत युवा विदर्भाच्या संघाने इतिहास रचला आहे. विजयानंतर बोलताना विदर्भ संघाचा कर्णधार फैज फजलने सर्वांची मने जिंकली आहेत. बक्षिसातून मिळणार सर्व रक्क पुलवामा येथे शहीद झालेल्या कुटुंबियांना देणार असल्याचे फैजने सांगितले. फैजच्या या वक्तव्यानंतर मैदानावर उभा असलेल्या प्रत्येकाने टाळी वाजवून त्याच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. गुरुवारी पुलवामा येथे दहशतवाद्यानी केलेल्या भ्याड हल्यात ४० सीआरपीएफच्या जवान शहीद झाले होते. जवानाप्रति आपली भावना व्यक्त करताना फैज भावूक झाला होता.

सलग दोन वर्ष रणजी आणि इराणी चषकावर नाव कोरत विदर्भाच्या संघाने इतिहासात आपलं नाव कोरलं आहे. विदर्भ आणि शेष भारत यांच्यात झालेला आंतिम सामना अनिर्णित झाला. शेष भारताने दिलेलं २८० धावांचं आव्हान विदर्भाच्या फलंदाजांनी संयमीपणे फलंदाजी करत पूर्ण करत आणलं होतं. मात्र दुसऱ्या डावात गणेश सतीश बाद झाल्यानंतर दोन्ही कर्णधारांनी एकमताने सामना थांबवण्याचा निर्णय केला, यानंतर विदर्भाने पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर सामन्यात विजय मिळवला. विदर्भाचं हे इराणी करंडकाचं सलग दुसरं विजेतेपद ठरलं आहे. काही दिवसांपूर्वी विदर्भाने रणजी करंडकाच्या अंतिम फेरीत सौराष्ट्रावर मात करत सलग दुसऱ्यांना रणजी करंडक पटकावण्याचा बहुमान मिळवला होता.

इराणी चषकाच्या विजयाची रक्कम आपण पुलवामात शहीद झालेल्या सीआरपीएफ जवानांच्या कुटुंबियाच्या निधीला देत असल्याची घोषणा  फैझनं केल्याचा व्हिडीओ बीसीसीआय डोमेस्टिकच्या ट्विटर खात्यावर टाकण्यात आला आहे. त्याच्या या घोषणेनं भारतीय नागरिकांची मनंही जिंकून दिली.

 फैजवर सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. नेटीझन्स फैजच्या निर्णयाचे स्वागत करत आहेत.