दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या शानदार विजयामुळे आम्ही अधिक प्रोत्साहित होतो आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध घरच्या मालिकेत पराभव पत्करल्यामुळे आम्हाला स्वत:ला सिद्ध करायचे होते. या जिद्दीमुळेच आम्ही कांगारूंना धूळ चारू शकलो, अशी प्रतिक्रिया भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने व्यक्त केली.

शिखर धवनचे शतक, रोहित शर्मा व कोहलीचे अर्धशतक आणि भुवनेश्वर कुमार व जसप्रीत बुमरा यांच्या प्रभावी गोलंदाजीच्या बळावर भारताने रविवारी ऑस्ट्रेलियाला ३६ धावांनी पराभूत केले. या विजयाचे विश्लेषण करताना कोहली म्हणाला, ‘‘ऑस्ट्रेलियाविरुद्ध आम्ही मार्च महिन्यात झालेल्या घरच्या मैदानावरील मालिकेत २-० अशा आघाडीवरून २-३ अशा फरकाने मालिका गमावली. त्यामुळे या सामन्यात स्वत:ला सिद्ध करण्यासाठी आम्ही अधिक प्रोत्साहित होतो. त्याशिवाय त्या मालिकेत तर मिचेल स्टार्कसुद्धा नव्हता. मात्र रविवारच्या सामन्यात स्टार्कचा समावेश असूनही आम्ही ऑस्ट्रेलियाला नमवल्यामुळे मी फार आनंदित आहे.’’

आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध विजय मिळवल्यामुळे भारतीय संघावर चोहीकडून कौतुकाचा वर्षांव होत असून त्यांचे उपांत्य फेरीतील स्थान पक्के मानले जात आहे. मात्र स्वत: कोहलीने याकडे दुर्लक्ष करून पुढील सामन्याकडे लक्ष वेधले. ‘‘माझ्या मते आताच उपांत्य फेरीतील स्थानाविषयी चर्चा करणे मूर्खपणाचे ठरेल. किमान सहा सामने झाल्यावर या गोष्टीचा आढावा घेता येऊ शकेल. परंतु दोन तुल्यबळ संघांना पराभूत केल्यामुळे खेळाडूंचा आत्मविश्वास कमालीचा उंचावला असून याच आत्मविश्वासाच्या बळावर आम्ही न्यूझीलंडविरुद्ध मैदानात उतरू,’’ असे कोहलीने सांगितले.

भुवनेश्वर दुसऱ्या क्रमांकाचा वेगवान गोलंदाज -अरुण

लंडन : ऑस्ट्रेलियाविरुद्ध मोक्याच्या क्षणी तीन बळी मिळवून भारताला विजय मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावणारा भुवनेश्वर कुमार हा विश्वचषकाच्या सुरुवातीपासूनच आमचा दुसऱ्या क्रमांकाचा वेगवान गोलंदाज आहे, असे गोलंदाजीचे प्रशिक्षक भरत अरुण यांनी स्पष्ट केले.

स्मिथच्या मदतीला कोहली धावला!

ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्हन स्मिथची भारतीय प्रेक्षक हुर्यो उडवत असताना त्यांना तसे करण्यापासून रोखतानाच चाहत्यांच्या वतीने स्मिथची माफी मागत कोहलीने त्याच्या दिलदारपणाचे दर्शन घडवले. स्मिथच्या मदतीला पुढे येणाऱ्या कोहलीच्या या कृतीचेदेखील प्रसारमाध्यमांनी कौतुक केले. तब्बल एक वर्षांचे निलंबन पूर्ण करून परतलेल्या स्मिथला इंग्लंडमधील बहुतांश मैदानांवर प्रेक्षकांकडून हुर्यो सहन करावी लागत आहे. रविवारच्या भारताविरुद्धच्या सामन्यातदेखील स्मिथ क्षेत्ररक्षण करीत असतानादेखील काही हुल्लडबाज प्रेक्षकांनी स्मिथच्या दिशेने ‘चीटर.. चीटर’ अशा घोषणा देण्यास सुरुवात केल्यावर कोहलीने त्यांना इशारा करून तसे करण्यापासून रोखले.

 ‘बेल्स’ नाटय़ावरून कोहली, फिंचची तक्रार

यंदाच्या विश्वचषकात तब्बल पाचव्यांदा चेंडूने यष्टय़ांना स्पर्श करूनसुद्धा बेल्स खाली न पडल्यामुळे विराट कोहली आणि आरोन फिंच यांनी सोमवारी या कृत्याविषयी तक्रार नोंदवून आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (आयसीसी) याकडे लक्ष वेधले. रविवारी भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामन्यात जसप्रीत बुमराने टाकलेला पहिलाच चेंडू डेव्हिड वॉर्नरच्या बॅटची कड घेऊन यष्टय़ांवर आदळला. मात्र चेंडूचा यष्टय़ांना स्पर्श होऊनसुद्धा बेल्स खाली न पडल्यामुळे वॉर्नरला नाबाद ठरवण्यात आले. ‘‘एखादा गोलंदाज मेहनतीने फलंदाजाला चकवून यष्टय़ांचा वेध घेतो आणि अशा वेळी बेल्स न उडाल्यास तो निराश होणे स्वाभाविक आहे. त्यामुळे यावर लवकर तोडगा काढला पाहिजे,’’ असे कोहलीने सांगितले. ‘‘तंत्रज्ञानात क्रिकेटने फार प्रगती केली असूनही तेच क्रिकेटसाठी मारकसुद्धा ठरत आहे, ही खेदजनक बाब आहे. आजच्या क्रिकेटमध्ये गोलंदाजांना चुका करण्याची संधीच नाही. त्यातच जर आता बेल्ससुद्धा निघाल्या नाहीत तर ते तरी काय करणार. म्हणूनच या निर्णयात बदल करावा,’’ असे फिंचने सुचवले.