|| प्रशांत केणी

मोटेराच्या नरेंद्र मोदी क्रिकेट महास्टेडियमवर दोन दिवसांत संपलेल्या तिसऱ्या कसोटीचे कवित्व अजूनही टिकून आहे. अर्थात या चर्चांचा केंद्रबिंदू खेळपट्टी हाच आहे. खेळपट्टी उत्तम, परंतु सुमार फलंदाजीमुळे सामना लवकर निकाली ठरला, अशी ग्वाही भारताचा कर्णधार विराट कोहलीने दिली. हे विश्लेषण महान क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांच्यापासून इंग्लंडमध्येही काही जणांना पटते. याव्यतिरिक्त दुसरा मतप्रवाह खेळपट्टीला दर्जाहीन ठरवणारा आहे.

अपयशाला कारणमीमांसा असते, यशात हे सारे झाकोळले जाते, हे वास्तव पुन्हा एकदा समोर आले. भारतात येण्यापूर्वी इंग्लंडने श्रीलंकेत २-० असे निर्भेळ यश मिळवले. फिरकीला नंदनवन मानल्या जाणाऱ्या खेळपट्ट्यांवर जॅक लीच आणि डॉम बेस या फिरकी गोलंदाजांच्या बळावर इंग्लंडने श्रीलंकेचे चक्रव्यूह भेदले. त्यानंतर भारतात चेन्नईची पहिली कसोटीही त्यांनी खिशात घातली. यशाच्या मार्गावर विराजमान इंग्लंडला खेळपट्टी कधीच डोळ्यांत खुपली नाही. अगदी २०१२मध्ये इंग्लंडने भारतीय भूमीवर फिरकीच्या बळावर २-१ असे यश मिळवले, तेव्हासुद्धा इंग्लंडने खेळपट्टी हा विषय कधीच चर्चेत आणला नाही. मोटेराच्या खेळपट्टीवर पहिल्या दिवशी १३ आणि दुसऱ्या दिवशी १७ असे एकूण ३० फलंदाज पावणेदोन दिवसांत बाद झाले. यापैकी २८ फलंदाजांनी फिरकीसमोर लोटांगण घातले. या बाद झालेल्या फलंदाजांचे वळलेल्या चेंडूंवर आणि सरळ चेंडूंवर असे वर्गीकरण केल्यास कोहलीचे म्हणणे पटेल.

‘जसा देश, तसा वेश’ या म्हणीप्रमाणे ‘जसा देश, तशी खेळपट्टी’ हे ब्रीद क्रिकेटमध्ये कित्येक दशके रूढ आहे. ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका या देशांमध्ये वेगवान गोलंदाजांसाठी, तर भारत, श्रीलंका, पाकिस्तान, बांगलादेश या आशियाई देशांमध्ये फिरकीला पोषक खेळपट्ट्या वर्षानुवर्षे तयार केल्या जातात. दोन महिन्यांपूर्वी अ‍ॅडलेड कसोटीत ऑस्ट्रेलियाच्या जोश हेझलवूड आणि पॅट कमिन्सच्या वेगवान माऱ्यापुढे भारतीय फलंदाजांची ३६ धावांवर तारांबळ उडाली. हेसुद्धा खेळपट्टीचेच गुणधर्म. चेन्नईत दुसरी कसोटी भारताच्या बाजूने निकाली ठरल्यावर खेळपट्टीचा मुद्दा उचलून धरणाऱ्या टीकाकारांना रोहित शर्माने प्रामाणिकपणे उत्तर दिले होते. ‘‘दोन्ही संघांसाठी खेळपट्टी समान असते. मग इतकी चर्चा कशाला? भारतात गेली अनेक वर्षे अशाच खेळपट्ट्या बनतात. प्रत्येक संघ मायदेशातील वातावरण आणि खेळपट्ट्यांचा फायदा घेतो. अन्य देशांत आमचीसुद्धा अशीच अवस्था होते.’’

खेळपट्टीच्या गृहअनुकूलतेच्या धोरणावर अंकुश ठेवण्यासाठी २००६पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) खेळपट्टी आणि मैदान निरीक्षण प्रक्रिया कार्यान्वित केली. पण तरीही परिस्थिती बदलली नाही. या धोरणान्वये खेळपट्टीबाबत चांगली-वाईट शेरा देण्याचे अधिकार सामनाधिकाऱ्यांना देण्यात आले. आतापर्यंत १४ सामन्यांच्या खेळपट्ट्यांना खराब किंवा वाईट असे शेरे मिळाले आहेत. यापैकी पाच कॅनडातील सामने वगळले, तर ‘आयसीसी’चे पूर्ण सदस्यत्व असलेल्या राष्ट्रांमधील उर्वरित नऊ सामन्यांपैकी चार हे भारतातील आहेत. २००४मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धची वानखेडेवरील कसोटी तीन दिवसांत संपल्यावर ‘मुंबई क्रिकेट संघटनेचा कसोटी केंद्राचा दर्जा काढून का घेऊ नये?’ असा खलिता भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे तत्कालीन अध्यक्ष जगमोहन दालमिया यांना ‘आयसीसी’कडून आला. त्यानंतर सुधीर नाईक यांची क्यूरेटर म्हणून नियुक्ती करीत २००६च्या इंग्लंडविरुद्धच्या सामन्यासाठी स्पोर्टिंग खेळपट्टी बनवण्यात आली. चेन्नईच्या पहिल्या कसोटीचा निकाल भारताच्या विरोधात गेल्यानंतर तपोश चॅटर्जी यांनाच लक्ष्य करण्यात आले. त्यामुळे दुसऱ्या कसोटीसाठी व्ही. रमेश कुमार यांच्यासह भारतीय संघ व्यवस्थापनानेही खेळपट्टीचे दिग्दर्शन केले. चेन्नईच्या दुसऱ्या आणि अहमदाबादच्या तिसऱ्या कसोटीत पहिल्या दिवसापासून चेंडू वळेल, असा दावा भारताकडून केला गेला. तसे अपेक्षेनुरूप घडलेही. भारतासाठी अनुकूल आणि इंग्लंडसाठी प्रतिकू ल निर्णय लागल्याने चर्चा तर होणारच. करोना साथीच्या पार्श्वभूमी वर पंच आणि सामनाधिकारी त्रयस्थ नसल्याने अहवालाचे कार्य जवागल श्रीनाथ यांनाच करावे लागणार आहे. परंतु मोटेराचा अहवाल दोन सामन्यांचा असेल. त्यामुळे इथेही टीकाकारांना संधी आहे.

अहमदाबादची कसोटी दोन दिवसांत संपली, हे तसे कसोटी क्रिकेटसाठी वाईट. फक्त दोनच दिवसांचा खेळ झाल्यामुळे क्रिकेटच्या अर्थकारणालाही त्याचा फटका बसणे स्वाभाविक आहे. करोना साथीतून सावरत असताना स्टेडियममध्ये प्रवेश मिळालेल्या ५५ हजार प्रेक्षकांची निराशा झाली. याचप्रमाणे प्रक्षेपणकर्ते, जाहिरातदार, विक्रे ते अशा अनेक घटकांना मोठा तोटा सहन करावा लागला.

खेळपट्टीच्या नियमानुसार म्हणजेच युद्धनीतीनुसारच खेळपट्टी नामक रणभूमीचा हा खेळ क्रिकेटमध्ये वर्षानुवर्षे खेळला जातो आहे. यावर पूर्णपणे शिस्तबद्धता आणण्यासाठी पंचांप्रमाणेच क्युरेटरसुद्धा त्रयस्थ देशांचा नेमण्याची पद्धती अमलात आणावी लागेल. यात आणखी उपयुक्त म्हणजे वेगवान गोलंदाजांसाठी अनुकूल देशांमध्ये आशियाई क्युरेटर आणि तसेच विरुद्ध पद्धतीने राबवल्यास खेळासाठी उपयुक्त ठरेल. पण खेळपट्ट्यांच्या जडणघडणीत वातावरणाचाही मोठा भाग असतो, याकडे दुर्लक्ष करता येणार नाही.

Prashant.keni@expressindia.com