भारताचा माजी कप्तान न शैलीदार डावखुरा फलंदाज सौरव गांगुलीनं विराट कोहलीवर स्तुतीसुमनांचा वर्षाव केला आहे. एका मुलाखतीत सौरवनं म्हटलंय की विदेश दौऱ्यात कौहलीच्या नेतृत्वाखाली कसोटी मालिकांमध्येही भारत विजयी होईल यात शंका नाही. मी महेंद्र सिंह ढोणी व राहुल द्रविडला बराच काळ कप्तान म्हणून जवळून बघितलं आहे, परंतु कप्तान कोहली ज्या सातत्यानं फलंदाजी करतो ते मी याआधी कधीही बघितलेलं नाही अशा शब्दांमध्ये सौरवनं विराटचं कौतुक केलं आहे.

स्वत:च उदाहरण समोर ठेवून तो कप्तानपदाला साजेशी खेळी करतो असं सांगताना गांगुलीनं अफ्रिकेविरोधात विराटनं फटकावलेल्या तीन शतकांचं उदाहरण दिलं. इंग्लंड व ऑस्ट्रेलिया असे दोन दौरे आता भारतीय संघ येत्या काऴात करणार आहे. भारतीय संघ तयारीसाठी दोन्ही देशांमध्ये काही काळ आधीच जाणार आहे, तर त्यांनी दोन चार सराव सामने मालिका सुरू होण्यापूर्वी खेळावेत असा सल्ला गांगुलीनं दिला आहे. भारताच्या सर्वाधिक यशस्वी कप्तानांपैकी एक असलेल्या सौरवनं कोहली हा निर्विवादपणे सर्वोत्कृष्ट फलंदाज असल्याचे म्हटले आहे. गेल्या वर्षी म्हणजे 2017 मध्ये सर्वाधिक एकदिवसीय धावा कोहलीच्या नावावर असून 2018मध्येही तो याबाबतीत आघाडीवर आहे.

कोहली हा भारताची क्रिकेटमधली ओळख बनत आहे. काही बाबतीत तो मी, तेंडुलकर व द्रविडपेक्षाही वेगळा असल्याचं मत गांगुलीनं व्यक्त केलं आहे. गेली काही वर्षे कोहली फॉर्ममध्ये असून शुक्रवारी त्यानं 35 वे एकदिवसीय शतक झळकावलं. दोन संघांमधल्या एकदिवसीय मालिकेत 500 धावा फटकावणारा तो पहिला फलंदाजही ठरला आहे. कोहलीनं एकदिवसीय मालिकेतील सहा सामन्यांमध्ये तीन शतकं व एक अर्धशतक झळकावलं आहे. आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये कोहलीच्या नावावर 56 शतकं आहेत. त्यात कसोटीतल्या 21 व वन डेमधल्या 35 शतकांचा समावेश आहे.

सर्वाधिक शतकांच्या बाबतीत तो पाचव्या स्थानावर असून त्याच्यापुढे सचिन तेंडुलकर (100), रिकी पाँटिंग (71), कुमार संगकारा (63) व जॅक्विस कॅलिस (62) आहेत. कोहलीचं वय अवघं 29 असून त्याच्यासमोर भरपूर काळ व संधी आहेत, ज्यामुळे तो तेंडुलकरच्या विक्रमापर्यंत पोहोचू शकेल.