पेनल्टी शूटआऊट म्हणजे थरारक  खेळाची पर्वणी. कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेत अर्जेटिना आणि कोलंबिया सामना निर्धारित वेळेत बरोबरीत संपला. क्षणाक्षणाला उत्कंठा आणि दडपण वाढवणाऱ्या पेनल्टी शूटआऊटमध्ये बरोबरी कायम राहिली. ‘सडन डेथ’ प्रकारात अर्जेटिनाने बाजी मारली आणि उपांत्य फेरीत स्थान पटकावले. कालरेस टेव्हेझ अर्जेटिनाच्या विजयाचा शिल्पकार ठरला.
कोपा अमेरिका फुटबॉल स्पध्रेतील उपांत्यपूर्व फेरीत कोलंबिया विरुद्ध अर्जेटिना ही लढत निर्धारित वेळेत गोलशून्य राहिल्याने पेनल्टी शूटआऊटचा मार्ग अवलंबिण्यात आला. त्यातही दोन्ही संघांकडून प्रत्येकी एक संधी हुकल्याने सामना ४-४ अशा बरोबरीनंतर संपला.
सडन डेथमध्ये कोलंबियाकडून कॅमिलो झुनिगा आला, परंतु अर्जेटिनाचा गोलरक्षक सर्गिओ रोमेरोने अप्रतिमरीत्या त्याचा प्रयत्न हाणून पाडला. अर्जेटिनाकडूनही आलेल्या माकोर्स रोजोलाही अपयश आल्याने लढत ४-४ अशी होती. कोलंबियाकडून दुसऱ्या प्रयत्नासाठी आलेल्या जेसन मुरिल्लो यालाही अपयश आल्याने सामना पुन्हा अर्जेटिनाच्या बाजूने झुकला.
मात्र, गोल करण्यासाठी पुढे सरसावलेल्या कार्लोस टेव्हेझसमोर २०११च्या कोपा अमेरिका स्पध्रेच्या कटू आठवणी उभ्या राहिल्या.  मात्र, टेव्हेझने तो दबाव झटकून गोलरक्षक डेव्हिड ऑस्पिना याला चकवत अर्जेटिनासाठी विजयी गोल केला आणि नवा इतिहास लिहिला.

माझ्या चुकीमुळे २०११साली घरच्या प्रेक्षकांसमोर संघाला स्पध्रेतून बाहेर जावे लागले होते. ती काळरात्र अजूनही स्मरणात होती. परंतु फुटबॉलमध्ये नेहमी दुसरी संधी मिळते. हा विजय माझ्या एकटय़ाचा नसून संघाचा आहे. या विजयी संघाचा सदस्य असल्याचा मला अभिमान आहे.
– कार्लोस टेव्हेझ

२०११च्या अनुभवामुळे पेनल्टी शूटआऊटसाठी निवडलेल्या पाच खेळाडूंमध्ये टेव्हेझला संधी न देण्याचा निर्णय मी घेतला होता. आम्हाला त्याच्यावर कोणत्याही प्रकारचे दडपण टाकायचे नव्हते.
– गेराडरे मार्टिनो, अर्जेटिनाचे प्रशिक्षक

२०११च्या उपांत्यपूर्व सामन्यात उरुग्वेविरुद्ध पेनल्टी शूटआऊटची संधी टेव्हेझने दवडल्याने अर्जेटिनाचे आव्हान संपुष्टात आले. फुटबॉल चाहत्यांच्या डोळ्यासमोर झटकन हे चित्र उभे राहिले. अर्थातच टेव्हेझही ती दुर्दैवी रात्र विसरला नव्हता.

१९९३
साली अर्जेटिनाने कोपा अमेरिका स्पध्रेत कोलंबियावर पेनल्टी शूटआऊटमध्ये ६-५ असा विजय साजरा केला होता.