विजेतेपदाची दावेदार असलेल्या कॅरोलीन वोझ्नियाकीने धडाकेबाज विजय मिळवत ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरी गाठली. याचप्रमाणे कार्ला सोरेझ नॅव्हेरोनेदेखील उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळवले.

जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर असलेल्या वोझ्नियाकीने चौथ्या फेरीत १९व्या मानांकित मॅगडेलिना रिबारिकोवाचा ६-३, ६-० असा दणदणीत पराभव केला. हा सामना तिने एक तास तीन मिनिटांमध्ये जिंकला. त्या तुलनेत नॅव्हेरोला इस्तोनियाच्या अ‍ॅनेट कोन्तावेटविरुद्ध विजय मिळवताना झगडावे लागले. सव्वादोन तास चाललेली ही लढत तिने ४-६, ६-४, ८-६ अशी जिंकली. पहिला सेट गमावल्यानंतर तिने सव्‍‌र्हिस व परतीचे फटके यांवर नियंत्रण मिळवत विजयश्री खेचून आणली. शेवटच्या सेटमध्ये १-४ अशी ती पिछाडीवर होती. मात्र तेथून तिने परतीचे आक्रमक फटके व अचूक सव्‍‌र्हिस असा खेळ करीत सामना जिंकला. बेल्जियमच्या एलिस मेटीन्सने चुरशीच्या लढतीत पेत्रा मर्टिकला ७-६ (७-५), ७-५ असे पराभूत केले. या सामन्यातील दुसऱ्या सेटच्या वेळी पेत्राला पाठ व पोटातील वेदनांचा त्रास झाल्यामुळे वैद्यकीय मदत घ्यावी लागली होती.

रिबारिकोवा ही खूप जिगरबाज खेळाडू आहे. मात्र तिने माझ्याविरुद्ध उगीचच आक्रमक खेळ करण्याचा प्रयत्न केला. तिचा हा प्रयत्न असफल ठरला. त्हा सामना तीन सेट्सपर्यंत होईल अशी माझी अपेक्षा होती व त्या दृष्टीने मनाची तयारी केली होती. – कॅरोलीन वोझ्नियाकी