21 February 2019

News Flash

‘अकादमी’ ठरतेय कॅरमचा स्ट्रायकर

राज्यात कॅरममधील नवी पिढी घडण्यासाठी चाललेल्या अभियानाचा घेतलेला हा वेध..

|| ऋषिकेश बामणे

आधुनिक काळानुसार मानवाच्या राहणीमानात जसे बदल होत गेले, त्याप्रमाणे क्रीडा क्षेत्रातील जवळपास सर्वच प्रकारांतही काही आमूलाग्र बदल झाले. मात्र कॅरमने त्याची पाळेमुळे खोलवर रुजवून ठेवत पारंपरिकता जपली. गेल्या काही दशकांत हा खेळ युवा पिढीसाठी मनोरंजनाचे हक्काचे साधन म्हणून उदयास आला. समाजमाध्यमांवर कधी होणारे कौतुक तर कधी उठणारी टीकेची झोड यामुळे क्षणाक्षणाला वाढत्या स्पर्धेत स्वत:ला नवा आविष्कार न दिलेल्या कॅरमचेच अस्तित्व धोक्यात येईल का, अशी भीती क्रीडाप्रेमींच्या मनात घर करून होती. मात्र या खेळाचेच देणे लागणाऱ्या काही नामवंत माजी खेळाडूंना कॅरमला तारले. सध्याच्या घडीला महाराष्ट्राचे खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली छाप पाडत आहेत. भविष्यातही अशाच प्रकारचे खेळाडू उदयास यावेत, या हेतूने मुंबईतील संगीता चांदोरकर कॅरम अकादमी, सिंधुदुर्गमधील सावंतवाडी नगर परिषद कॅरम प्रशिक्षण केंद्र आणि नागपूरमधील राज कॅरम अकादमी यांनी पुढाकार घेतला आहे. राज्यात कॅरममधील नवी पिढी घडण्यासाठी चाललेल्या अभियानाचा घेतलेला हा वेध..

मुंबईतील एकमेव कॅरम अकादमी

मुंबईचा दादर परिसर तसा नेहमीच गजबजलेला, मात्र तरीही येथील धावपळीच्या जीवनातून वेळ काढून माजी महिला कॅरमपटू संगीता चांदोरकर यांनी सुरू केलेल्या कॅरम अकादमीने अल्पावधीतच स्वत:चे वेगळे स्थान निर्माण केले आहे. रिझव्‍‌र्ह बँकेत कार्यरत असणाऱ्या संगीता यांच्या कॅरम अकादमीला यंदा स्वातंत्र्यदिनी प्रारंभ झाला. सुरुवातीला ५ ते रात्री १० पर्यंत खुली असणारी ही अकादमी आता त्याहून एक तास अगोदर खुली होते. विविध वयोगटांसाठी येथे वेळेची विभागणी करण्यात आली असून यातील रात्री ८ ते ९ हा वेळ नामांकित कॅरमपटूंसाठी राखीव ठेवण्यात आला आहे. कनिष्ठ गटातील मुलींना येथे मोफत प्रशिक्षण देण्यात येते. सलग सात विश्वचषकांचा अनुभव असणाऱ्या संगीता यांना त्यांचा भाऊ विजय व अकादमीतील सहकारी विक्रांत दिवार, राजू धाटिया, सिद्धांत जाधव आणि श्रुती घोडके यांचेही मोलाचे योगदान आहे. या अकादमीचे सर्वात उल्लेखनीय यश म्हणजे सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीस पुण्याला झालेल्या राज्यस्तरीय कॅरम स्पर्धेत येथील खेळाडू नीलम घोडकेने नामांकित कॅरमपटू काजल कुमारीला धूळ चारून विजेतेपद मिळवले. मुंबईतील १११ क्लब्सना झुंज देणारी ही एकमेव कॅरम अकादमी येणाऱ्या काळात महाराष्ट्राला कॅरममधील नवे तारे देईल, अशी आशा आहे.

माझे गुरू दशरथ येलवे यांचे कॅरम अकादमीचे स्वप्न पूर्ण केल्याचे समाधान मला आयुष्यभर मिळणार आहे. त्याशिवाय महिला व मुलींना या अकादमीतर्फे विविध स्पर्धामध्ये सहभाग घेता यावा, हा हेतू होता. क्लबमध्ये विशेषत: मुलांचेच वर्चस्व दिसते, मात्र अकादमीद्वारे मला त्यांची मक्तेदारीही मोडीत काढायची आहे.    – संगीता चांदोरकर

संगीता चांदोरकर

  • ९२२२४६५९४६
  • पत्ता : संगीता चांदोरकर कॅरम अकादमी, महाराष्ट्र कामगार कल्याण क्रीडा मंडळ, ललित कला भवन, दादर (पूर्व).

 

दाक्षिणात्य खेळाडूंना कडवे आव्हान -केदार

महाराष्ट्रातील कॅरम अकादमींच्या वाढत्या संख्येमुळे दाक्षिणात्य राज्यांतील खेळाडूंना कडवी झुंज निर्माण होईल, अशी प्रतिक्रिया माजी कॅरमपटू अरुण केदार यांनी व्यक्त केली आहे. ते म्हणाले, ‘‘चेन्नईतील कॅरमपटूंचे विविध देशांतर्गत स्पर्धामध्ये आपल्याला मोठय़ा प्रमाणावर वर्चस्व पाहावयास मिळते. किंबहुना चेन्नईतील कॅरमचे सदिच्छादूत ए. मारिया इरुद्यम यांच्यापासून सुरू असलेली वर्चस्वाची ही मालिका सध्याच्या सगाया भारतीसारख्या खेळाडूंपर्यंत कायम आहे. मात्र महाराष्ट्रात उदयास येणाऱ्या कॅरमच्या अकादम्यांमुळे आपले खेळाडूही आता दाक्षिणात्य खेळाडूंना कडवी झुंज देतील, याची खात्री आहे.’’

 

सावंतवाडीतही कॅरमचा सूर

डिसेंबर २०१६मध्ये सुरू झालेल्या सावंतवाडी नगर परिषद कॅरम प्रशिक्षण केंद्रामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्य़ातील नागरिकांमध्ये कॅरमची आवड निर्माण झाली आहे. या अकादमीचे मुख्य वैशिष्टय़ म्हणजे येथे शिकवणारे प्रशिक्षक प्रशिक्षणाचे कोणतेही मूल्य आकारत नाहीत. जिल्हास्तरीय कॅरम असोसिएशनतर्फे मिळणाऱ्या मोबदल्यातच ते कॅरमच्या शिकवण्या देतात. येथे कार्यरत असलेल्या मुख्य प्रशिक्षकांपैकी एक आहेत ते राज्यस्तरीय कॅरमपटू योगेश फणसाळकर. सावंतवाडी जिमखाना क्रीडा संकुल येथे असलेल्या या अकादमीत योगेश त्यांच्या दोन सहकाऱ्यांसह २०१६पासून प्रशिक्षण देत आहेत. याचेच फळ म्हणून २०१६-१७च्या राष्ट्रीय स्पर्धासाठी सिंधुदूर्ग जिल्ह्य़ातील सात, तर राज्यस्तरीय स्पर्धेसाठी तब्बल १५ खेळाडूंनी पात्रता मिळवली. याव्यतिरिक्त, २०१७-१८च्या राज्यस्तरीय शालेय कॅरम स्पर्धेसाठी सिंधुदुर्गातील सहा खेळाडू पात्र ठरले होते. सर्व वयोगटांसाठी खुल्या असणाऱ्या या अकादमीत २५ ते ३० वयोगटातील मुलांचा समावेश सर्वाधिक आहे. या क्रीडा संकुलात कॅरमशिवाय टेबल टेनिस, क्रिकेट, बॅडमिंटन या खेळांचेही प्रशिक्षण दिले जाते.

सिंधुदुर्गसारख्या जिल्ह्य़ातून उदयोन्मुख खेळाडू घडवण्याच्या उद्देशानेच मी व माझे सहकारी कार्यरत आहोत. महाराष्ट्र कॅरम संघटना व सिंधुदुर्ग कॅरम संघटनेच्या सहकार्याने येथील खेळाडूंना आणखी उच्च दर्जाचे प्रशिक्षण देण्याचे आमचे लक्ष्य आहे.    – योगेश फणसाळकर

योगेश फणसाळकर

  • ७६२०७५५७६६
  • पत्ता : सावंतवाडी नगर परिषद कॅरम प्रशिक्षण केंद्र, सावंतवाडी जिमखाना क्रीडा संकुल, सावंतवाडी.

 

विदर्भात कॅरमचे ‘राज’

माजी कॅरमपटू राजू भैसारे यांच्या पुढाकाराने गेल्या वर्षी (२०१७) मे महिन्यात विदर्भातील एकमेव कॅरम अकादमीची सुरुवात झाली. राज कॅरम अकादमी नावाने सुरू असलेल्या या अकादमीने नुकतीच भरारी घेण्यास सुरुवात केली आहे. विदर्भ कॅरम संघटनेच्या अंतर्गत असलेल्या या अकादमीत सायंकाळी ६ ते ८.३० या वेळेत १५ मुली व ९ मुले कॅरमचे धडे घेतात. राजू भैसारेच या अकादमीची सर्व कामकाजे हाताळतात. त्याशिवाय हलाखीची परिस्थिती असलेल्या खेळाडूंना ते मोफत शिक्षणही देतात. नागपूरमध्ये असलेल्या १७ क्लब्सचा ही एकमेव कॅरम अकादमी नेटाने मुकाबला करत आहे.

राजू भैसारे

  • ९४२२८२१५२३
  • पत्ता : राज कॅरम अकादमी, मानकापूर इनडोर स्टेडियम, नागपूर.

First Published on October 12, 2018 2:26 am

Web Title: carrom academy in maharashtra