प्रशिक्षक अरुण केदार यांना विश्वास

ऋषिकेश बामणे, मुंबई</strong>

भारताची युवा पिढी कॅरमकडे मोठय़ा प्रमाणात वळत असून विशेषत: महिला आणि मुलींच्या दिमाखदार कामगिरीमुळे भविष्यातसुद्धा कॅरमचे भवितव्य नक्कीच उज्ज्वल आहे, अशी ठाम प्रतिक्रिया भारतीय संघाचे प्रशिक्षक आणि महाराष्ट्र कॅरम संघटनेचे उपाध्यक्ष अरुण केदार यांनी व्यक्त केली.

केदार यांच्या प्रशिक्षणाखाली भारताने नुकत्याच झालेल्या मालदीवविरुद्धच्या कसोटी मालिकेत ५-० असे निर्भेळ यश संपादन केले. त्याशिवाय अध्यक्षीय लीगमध्येसुद्धा भारताने चार पैकी तीन सुवर्णपदकांवर नाव कोरले. या स्पर्धेतील भारतीय खेळाडूंच्या कामगिरीविषयी विचारले असता केदार म्हणाले, ‘‘मालदीवविरुद्धच्या सामन्यात भारतीय खेळाडूंनी केलेल्या कामगिरीचा प्रशिक्षक म्हणून मला निश्चितच अभिमान वाटतो. परंतु अध्यक्षीय लीगमध्ये मुलींच्या १८ वर्षांखालील गटात महाराष्ट्राच्या आकांक्षा कदमने पहिल्यांदाच भारताचे प्रतिनिधित्व करताना मिळवलेल्या यशामुळे तिचे जितके कौतुक करावे तितके कमीच आहे. १३ वर्षीय आकांक्षाने तिच्याहून वयाने मोठय़ा असलेल्या खेळाडूंविरुद्धही वाखाणण्याजोगा खेळ केला. त्याचप्रमाणे या गटातील सोनाली आणि ममता कुमारी या अवघ्या १२ वर्षांच्या असून बिहारच्या चणपटिया भागातून त्यांनी कॅरमला सुरुवात केली आहे. कर्नाटकमध्ये महिलांना कॅरम खेळण्यासाठी फारसा वाव नसतानाही तेथील शायनी सेबेस्टेन अनेक अडथळ्यांवर मात करून इथपर्यंत पोहोचली आहे. तर चंदीगढमधील निधी कुमारीनेसुद्धा दमदार कामगिरी केली. त्यामुळे या युवा आणि नवोदित मुलींच्या कामगिरीने मला अधिक आनंद झाला.’’

‘‘महिला गटात भारताकडे अनुभवी खेळाडूंची फौज उपलब्ध असल्याने त्यांनी कसोटी सामन्याबरोबरच अध्यक्षीय लीगचे विजेतेपद मिळवणे अपेक्षितच होते. पुरुष गटात प्रशांत मोरे, झहीर पाशा यांसारखे मातब्बर खेळाडू असतानाही राजेशने पहिल्याच आंतरराष्ट्रीय स्पर्धेत धक्कादायक कामगिरी करून विजेतेपद पटाकवल्याने मलाही आश्चर्याचा धक्का बसला. कसोटी सामन्यांतही त्याने उत्तम कामगिरी केली,’’ असे केदार यांनी सांगितले.

मात्र श्रीलंकेच्या खेळाडूंकडून भविष्यात भारताला आणखी कडव्या आव्हानाला सामोरे जावे लागणार असल्याचा इशाराही केदार यांनी दिला. ‘‘मुलांच्या गटात श्रीलंकेच्या सुरज मधुवंथाने केलेला खेळ डोळ्याचे पारणे फेडणारा होता. बऱ्याच काळानंतर १७ वर्षीय मुलामध्ये इतक्या अव्वल दर्जाचा खेळ पाहण्यास मिळाला. त्यामुळे भविष्यात श्रीलंकन खेळाडू आपल्याला अधिक कडवे आव्हान देतील,’’ असे केदार म्हणाले.

‘‘पुढील वर्षी मालदीवचे खेळाडू पुन्हा कसोटी मालिकेसाठी भारतात येतील. त्यावेळीही अध्यक्षीय लीगचे आयोजन करण्याचे आमचे प्रयत्न आहेत. त्याशिवाय सध्या डिसेंबरमध्ये पुण्यात रंगणाऱ्या आयसीएफ चषकासाठीही भारतीय संघाची मोर्चेबांधणी करण्यावर माझा भर आहे,’’ असे केदार यांनी सांगितले.