पाकिस्तानी हॉकी संघाचा, भारतात होणाऱ्या हॉकी विश्वचषकाच्या प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला आहे. आर्थिक अडचणीत सापडलेल्या पाकिस्तान हॉकी फेडरेशनने गेल्या काही महिन्यांमध्ये आपल्या खेळाडूंचं मानधनही दिलेलं नव्हतं. त्यातच निधीच्या कमतरतेमुळे पाकिस्तानी संघ हॉकी विश्वचषकात सहभागी होईल की नाही याबद्दल शंका निर्माण झाली होती. मात्र आता पाकिस्तान सुपर लीग स्पर्धेतील पेशावर संघाचे मालक जावेद आफ्रिदी हे पाकिस्तानी संघाला प्रायोजकत्व देणार आहे.

पाकिस्तान हॉकी फेडरेशनसोबत आफ्रिदी यांनी 2020 सालापर्यंत करार केला आहे. सर्व आंतरराष्ट्रीय सामने व स्थानिक हॉकी सामन्यांसाठी हे प्रायोजकत्व देण्यात आलं आहे. या करारामुळे पाकिस्तान हॉकी संघाचा विश्वचषकातला प्रवेश निश्चीत झाला आहे, पाकिस्तान हॉकी फेडरेशनच्या अधिकाऱ्यांनी पत्रकारांना माहिती दिली.

28 नोव्हेंबर ते 16 डिसेंबर दरम्यान ओडीशातील भुवनेश्वर येथे हॉकी विश्वचषकाचे सामने रंगणार आहेत. आता पाकिस्तान हॉकी फेडरेशन खेळाडूंच्या व्हिसासाठी प्रयत्न करणार आहे. मध्यंतरीच्या काळात पाकिस्तान हॉकी फेडरेशनने क्रिकेट बोर्डाकडे कर्जाची मागणी केली होती. मात्र क्रिकेट बोर्डाने 80 लाख पाकिस्तानी रुपयांचं कर्ज देण्यासाठी नकार दिला होता. त्यामुळे मोठ्या अडचणींवर मात करुन भारतात येणारा पाकिस्तानचा संघ हॉकी विश्वचषकात कशी कामगिरी करतो याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.