भारतात होणाऱ्या आगामी हॉकी विश्वचषकासाठी पाकिस्तानी संघाच्या सहभागावर मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे. निधीची कमतरता असलेल्या पाकिस्तान हॉकी फेडरेशनने, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडे कर्जाची मागणी केली होती. मात्र पाक क्रिकेट बोर्डाने ही विनंती फेटाळल्याचं कळतंय. 28 नोव्हेंबरपासून भुवनेश्वर येथे हॉकी विश्वचषकाला सुरुवात होणार आहे.

गेल्या काही महिन्यांपासून पाकिस्तान हॉकी फेडरेशनने आपल्या खेळाडूंचं मानधन दिलेलं नाहीये. पाकिस्तान हॉकी संघाचे मुख्य प्रशिक्षक तौकीर दर आणि व्यवस्थापक हसन सरदार यांनी पाक क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष एहसान मणी यांच्याशी चर्चा करणार असल्याचं सांगितलं आहे. मात्र याआधीही पाकिस्तान हॉकी फेडरेशनने क्रिकेट संघटनेकडून घेतलेलं कर्ज न फेडल्यामुळे, एहसान मणी यांनी कर्ज देण्यास नकार दिल्याचं कळतंय. मात्र मणी यांनी, हॉकी फेडरेशनला सरकारी मदत मिळवून देण्याचं आश्वासन दिलं आहे.

अवश्य वाचा – हॉकी विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा; रुपिंदरपाल सिंहला वगळले

पाकिस्तान हॉकी फेडरेशनचे सचिव शाहबाज अहमद यांनी मात्र, पाकिस्तान हॉकी संघ विश्वचषकात सहभागी होण्याबद्दल साशंकता व्यक्त केली आहे. “फेडरेशनने वारंवार विनंती करुनही सरकारतर्फे योग्य ती मदत मिळाली नाहीये. हॉकी फेडरेशनने सरकारकडे 80 लाख पाकिस्तानी रुपयांची मागणी केली आहे. ही मदत योग्य वेळेत न आल्यास, आमचा संघ भारतात होणाऱ्या विश्वचषकात सहभागी होऊ शकणार नाही.” अहमद पीटीआयशी बोलत होते.