’ पुरस्कारांवर रूटची छाप  ’ रहाणेला विशेष पुरस्कार ’ दिलीप वेंगसरकर यांना जीवनगौरव

क्रिकेटजगतामधील मानाच्या सीएट वार्षिक पुरस्कारांवर इंग्लंडचा फलंदाज जो रूटने दोन पुरस्कार पटकावून छाप पाडली. वर्षांतील सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू आणि फलंदाज असे दोन पुरस्कार त्याला देण्यात आले. वर्षांतील सर्वोत्तम ट्वेन्टी-२० क्रिकेटपटूचा पुरस्कार भारताच्या विराट कोहलीने मिळवला. याशिवाय भारताचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांना माजी कर्णधार सुनील गावस्कर यांच्या हस्ते जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

‘‘भारतीय क्रिकेटकडून तब्बल १६ वष्रे खेळण्याचा आनंद मी लुटला, ती आयुष्यातील सर्वोत्तम वष्रे होती. निवृत्तीनंतर खेळाचे पांग फेडावेत, या भावनेने मी अकादमी काढली. अनेक मध्यमवर्गीय कुटुंबांतील क्रिकेटपटूंना खेळण्याचे व्यासपीठ दिले,’’ अशी प्रतिक्रिया वेंगसरकर यांनी पुरस्कार स्वीकारल्यावर व्यक्त केली.

ते पुढे म्हणाले, ‘‘श्रेयस अय्यर चांगला फॉर्मात आहे. त्याची भारतीय संघात निवड होणे अपेक्षित होते; परंतु दुर्दैवाने ती होऊ शकली नाही. मात्र आत्मविश्वासाने खेळत राहा, असा सल्ला मी त्याला दिला.’’

वर्षांतील सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय गोलंदाजांचा पुरस्कार स्वीकारल्यानंतर फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विन म्हणाला, ‘‘मी वयाच्या १७ व्या वर्षी म्हणजे तसे उशिराच ऑफ-स्पिन गोलंदाजी टाकण्याचे ठरवले. प्रथम श्रेणी क्रिकेटने मला अधिकाधिक चांगला क्रिकेटपटू बनवले, तर आयपीएलने मला कौशल्य दाखवण्याची संधी दिली.’’

माजी क्रिकेटपटू नरी काँट्रॅक्टर यांच्याकडून वर्षांतील सर्वोत्तम भारतीय क्रिकेटपटू हा पुरस्कार प्राप्त केल्यानंतर रोहित शर्मा म्हणाला, ‘‘२०१५-१६ हे वर्ष भारतासाठी अतिशय चांगले ठरले. श्रीलंकेत ऐतिहासिक कसोटी विजय मिळवल्यानंतर हा प्रवास सुरू झाला. मग दक्षिण आफ्रिकेविरुद्धची मायदेशातील मालिका भारताने जिंकली. ट्वेन्टी-२० विश्वचषकात आम्ही अप्रतिम कामगिरी केली, परंतु उपांत्य फेरीत वेस्ट इंडिजकडून हरलो. विंडीजची संपूर्ण स्पध्रेतील कामगिरी नेत्रदीपक होती.’’
chart

अजिंक्य रहाणेला विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या वेळी तो म्हणाला, ‘‘लक्ष केंद्रित करून खेळणे, हे माझे बलस्थान आहे. बालपणी कराटे खेळल्यामुळे हा गुण मला जोपासता आला.’’

मुंबईकर फलंदाज श्रेयस अय्यरला वर्षांतील सर्वोत्तम स्थानिक क्रिकेटपटूचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. याप्रसंगी तो म्हणाला, ‘‘हंगामाच्या सुरुवातीला मला काही चढउतारांना सामोरे जावे लागले. मात्र संघसहकाऱ्यांनी मला नैसर्गिक खेळण्याची मुभा दिली. त्यामुळेच मला आक्रमक पद्धतीने खेळता आले. भारतीय संघाकडून खेळण्याचे स्वप्न पूर्ण व्हावे, अशी आशा आहे.’’

वर्षांतील सर्वोत्तम कसोटीपटू आणि एकदिवसीय क्रिकेटपटू पुरस्कार अनुक्रमे केन विल्यमसन आणि मार्टिन गप्तील यांना मिळाले. मात्र ते या कार्यक्रमाला हजर राहू शकले नाहीत.