अक्षय टंकसाळे

मी क्रिकेटचा मोठा चाहता आहे. चित्रीकरणात व्यग्र असलो की मोबाइलवर सारख्या धावा पाहत असतो. भारतासहित अन्य संघांचे सामनेही पाहतो. शाळेत असताना शोरूममधील टीव्हीवर तासन्तास सामना पाहत एकाच जागेवर उभा राहायचो. अनेकदा घरचे मला शोधत यायचे. क्रिकेटपटू केदार जाधव हा माझा अतिशय जवळचा मित्र. माझ्यासाठी अगदी भावासारखाच. त्याच्यामुळे भारतीय संघाशी माझे वेगळे नाते निर्माण झाले आहे. विराट कोहली, महेंद्रसिंह धोनी, हार्दिक पंडय़ा यांना भेटून त्यांच्याशी तासन्तास बोललो आहे. याबद्दल मी स्वत:ला नशीबवान समजतो. धोनीला जेव्हा पहिल्यांदा भेटलो तेव्हा मी भांबावून गेलो होतो, क्षणभर काय बोलावे तेच मला कळत नव्हते. अशी माझी स्थिती झाली. धोनीने त्या वेळी मला माझ्या अभिनयातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. त्या दिवशी धोनीच्या व्यक्तिमत्त्वाने मला भारावून टाकले. तो दिवस मी विसरूच शकत नाही. सध्याच्या विश्वचषकातील संघांमध्ये इंग्लंड आणि भारत हे दोनच संघ ताकदवान वाटतात. आपल्या संघामध्ये सगळेच चांगल्या लयीमध्ये आहेत.

(शब्दांकन : भक्ती परब)