प्राजक्ता हनमघर

मी शारदाश्रमची असल्याने सचिन तेंडुलकर आमच्या शाळेचा आहे, याचा वेगळाच अभिमान असायचा. शाळेत असताना भारताने एखादा सामना हरला तर चिडचिड व्हायची. अनेकदा मी जेवायचेच नाही. परंतु हळूहळू हा केवळ खेळ आहे, या वास्तवाचे भान आले. ‘सचिन’ हे प्रेम असले तरी अनिल कुंबळे, रवींद्र जडेजा आणि महेंद्रसिंह धोनी असे बरेच खेळाडू मला वैयक्तिकरीत्या आवडतात. ‘आयपीएल’ आल्यापासून क्रिकेट पाहण्यात मला फार रस उरला नाही, कारण त्यात कुठला खेळाडू कुठल्या संघात खेळतो, हेच कळत नाही. त्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर होणारे सामने किंवा विश्वचषक पाहण्यात मला खरी उत्सुकता असते. २०११च्या विश्वचषकावेळी एका वृत्तवाहिनीवर क्रिकेट सामन्याविषयी थेट प्रक्षेपित चर्चा करण्याची जबाबदारी माझ्यावर आली आणि दडपण, उत्कंठा, कुतूहल, समाधान सगळेच भाव एकवटून आले. क्रिकेट पाहणे आणि क्रिकेटवर भाष्य करणे यातला फरक मला जाणवला, तो अविस्मरणीय अनुभव कायम माझ्या स्मरणात राहील. कामामुळे यंदाचा विश्वचषक पूर्ण पाहता आला नाही तरी भारतीय संघाचे सामने मात्र वेळात वेळ काढून पाहणार आहे.

(शब्दांकन – नीलेश अडसूळ)