भारताचा फिरकीपटू यजुर्वेद चहल हा सध्याच्या घडीला सर्वोत्तम फिरकीपटू आहे, असे कौतुकोद्गार पाकिस्तानचे माजी फिरकीपटू मुश्ताक अहमद यांनी काढले आहेत. चहलचा मैदानावर गोलंदाजी करण्यासाठी योग्यप्रकारे वापर केला तर तो अधिक प्रभावी कामगिरी करतो, याकडेही अहमद यांनी लक्ष वेधले.

‘‘चहल हा प्रभावी गोलंदाज आहे. सध्याच्या घडीला तो जगातील सर्वोत्तम लेगस्पिनर आहे. तो अधिक प्रभावी ठरण्यासाठी त्याचा मैदानावर अधिकाधिक वापर करून घेणे आवश्यक आहे. चहल योग्यप्रकारे खेळपट्टीचा अभ्यास करतो आणि त्याप्रमाणे त्याचे चेंडू टाकतो. फलंदाजाला अपेक्षा करता येणार नाही अशा पद्धतीने गुगलीचा वापर करत चहल त्याच्या फिरकीच्या जोरावर यश मिळवतो,’’ असे जगभरात विविध ठिकाणी प्रशिक्षक म्हणून जबाबदारी पार पाडलेल्या अहमद यांनी सांगितले.

चहल आणि कुलदीप यादव या भारताच्या युवा फिरकीपटूंची कामगिरी माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने यष्टय़ांच्या मागून केलेल्या मार्गदर्शनामुळे बहरली, याकडे मुश्ताक अहमद यांनी लक्ष वेधले. ‘‘भारताने जर सामन्यात गोलंदाज योग्यप्रकारे वापरले तर तीनही प्रकारच्या क्रिकेटमध्ये त्यांना यश मिळेल. मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये गोलंदाजांना मोक्याच्याक्षणी वापरण्याचे कसब धोनीला अवगत होते. आता कोहलीदेखील गोलंदाज योग्यप्रकारे वापरताना दिसत आहे. सर्वोत्तम कामगिरी करणारे फिरकीपटू संघात असणे आवश्यक आहे. प्रतिस्पर्धी फलंदाजांना सामन्यात कोणत्याही क्षणी बाद करण्याचे कौशल्य फिरकीपटूंमध्ये असले पाहिजे. पुढील १० ते १५ वर्षांत अनेक फिरकीपटू नावारूपाला येतील. वेगवान चेंडूंना सामोरे जाणे अनेक फलंदाजांना आवडते. मात्र लेगस्पिनर संघात असेल तर फरक पडतो,’’ असे मुश्ताक अहमद यांनी सांगितले.