News Flash

चक दे, इंडिया.. अखेरच्या दिवशी पावसासोबत भारतावर पदकांचाही वर्षांव

यजमान भारताची पदकांची थाळी शनिवारी रिकामीच राहिल्यानंतर येथील आशियाई अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेतील शेवटच्या दिवशी वरुणराजाबरोबरच भारतावर पदकांचाही वर्षांव झाला. महिलांच्या ४ बाय ४०० मीटर रिले शर्यतीत

| July 8, 2013 12:10 pm

यजमान भारताची पदकांची थाळी शनिवारी रिकामीच राहिल्यानंतर येथील आशियाई अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेतील शेवटच्या दिवशी वरुणराजाबरोबरच भारतावर पदकांचाही वर्षांव झाला. महिलांच्या ४ बाय ४०० मीटर रिले शर्यतीत भारतीय संघाने सोनेरी कामगिरी केली. रंजित माहेश्वरी (तिहेरी उडी), आशा रॉय (२०० मीटर धावणे), जितीन थॉमस (उंच उडी) यांनी रौप्यपदकाची कमाई केली. सतिंदर सिंग (४०० मीटर अडथळा), अर्पिदर सिंग (तिहेरी उडी), दुती चांद (२०० मीटर धावणे) व टिंटू लुका (८०० मीटर धावणे) यांनी कांस्यपदकाला गवसणी घातली.
शिवछत्रपती क्रीडानगरीत उपस्थित असलेल्या हजारो प्रेक्षकांच्या प्रोत्साहनाचा लाभ घेत भारताने ४ बाय ४०० मीटर रिले शर्यत ३ मिनिटे ३२.२६ सेकंदांत पार केली. निर्मला हिने पहिल्यांदा धावताना प्रतिस्पर्धी खेळाडूंबरोबर चांगला वेग ठेवला होता. ८०० मीटर धावण्यामध्ये सुवर्णपदक मिळवू न शकलेल्या टिंटू लुकाने योग्य रीतीने बॅटन घेत वेगात सातत्य ठेवत आघाडी घेतली. मग मरियम जोस हिने खणखणीत आघाडी घेतली. तिच्यानंतर धाव घेणाऱ्या व ४०० मीटर शर्यतीत रौप्यपदक मिळविणाऱ्या एम. आर. पुवम्मा हिने अन्य संघांपेक्षा ५० मीटरची आघाडी ठेवून शर्यत जिंकली. चीन व जपान यांना अनुक्रमे रौप्य व कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.
शर्यतीनंतर तिरंगा फडकावत भारतीय मुलींनी प्रेक्षकांच्या अभिनंदनाचा स्वीकार केला. शर्यतीविषयी विचारले असता पुवम्मा व टिंटू यांनी सांगितले, ‘‘अथक परिश्रमाचे चीज झाले आहे. घरच्या मैदानावर हे यश मिळाल्यामुळे आम्हाला खूप आनंद झाला आहे. शर्यतीपूर्वी थोडेसे दडपण होते, मात्र निर्मलाने चांगली सुरुवात केल्यानंतर आमचा आत्मविश्वास वाढला व शर्यत जिंकण्यासाठीच आम्ही धावलो. आता जागतिक स्पर्धेत पदक मिळविण्याचे आमचे ध्येय आहे.’’
जय शिवाजी, जय भवानीचा नारा!’
भारतीय महिलांनी रिले शर्यत जिंकल्यानंतर प्रेक्षकांनी ढोल ताशा वाजवित जल्लोष केला. तसेच ‘जय शिवाजी, जय भवानी’ आणि ‘भारतमाता की जय’ असे नारे दिले. या शर्यतीचे पदक वितरण झाल्यानंतर भारताचे राष्ट्रगीत सुरू असताना प्रेक्षकांनीही सामूहिक स्वरूपात त्यास दाद दिली.
उंच उडीत भारताचे सुवर्णपदक हुकले !
पुरुषांच्या उंच उडीत भारताच्या जितीन थॉमस याने रुपेरी कामगिरी केली. या क्रीडा प्रकारात चीनचा बेई झियांगलिंग, भारताचा थॉमस व इराणचा केयाने घनबाझ्रेदेह यांनी प्रत्येकी २.२१ मीटर अशी सर्वाधिक उडी मारली. त्या तिघांनीही समान चुका केल्या. त्यामुळे पदकाचा निर्णय ठरविण्यासाठी २.२४ मीटपर्यंत उंची ठेवण्यात आली, मात्र एकालाही उडी मारता आली नाही. त्यामुळे पुन्हा २.२१पर्यंत उंची करण्यात आली. पहिल्या प्रयत्नात ते तिघेही अपयशी ठरले. दुसऱ्या प्रयत्नात झियांगलिंगने ही उंची पार केली, मात्र थॉमस व केयाने अपयशी ठरले. त्यामुळे झियांगलिंगला सुवर्णपदक देण्यात आले तर थॉमस व केयाने या दोघांनाही रौप्यपदक मिळाले.
शेवटच्या दिवसाची सुरुवात सतिंदर सिंगच्या कांस्यपदकाने झाली. पंजाबच्या या खेळाडूने ४०० मीटर अडथळा शर्यतीत कांस्यपदक (५०.३५ सेकंद) मिळवत रविवारी त्याने भारताच्या खात्यावर पहिले पदक नोंदवले. पहिलेच आशियाई पदक मिळविणाऱ्या सतिंदरने एक शतांश सेकंदाने जपानच्या युता इमाझाकी याला हरवत हे यश संपादन केले. जपानचा यासुहिरो फुकी (४९.८६ सेकंद) व चीनचा चेंग वोन (५०.०७ सेकंद) यांनी अनुक्रमे सुवर्ण व रौप्यपदक मिळविले.
शर्यत संपल्यानंतर सतिंदर लगेचच जमिनीवर कोसळला. त्याविषयी विचारले असता तो म्हणाला, ‘‘अंतिम रेषा पार करताना माझ्याजवळ दोन खेळाडू होते मी त्यांच्याकडे पाहत अंतिम रेषा पार करताना माझा पाय घसरला. कांस्यपदकाचे समाधान असले तरी पावसामुळे मी ४९.१९ सेकंद ही सर्वोत्तम कामगिरी करू शकलो नाही. माझे काका जोिगदर सिंग हे राष्ट्रीय खेळाडू होते. त्यांच्या प्रोत्साहनामुळेच मी या खेळात आलो.’’
तिहेरी उडीत रंजित माहेश्वरी (१६.७६ मीटर) व अर्पिदर सिंग (१६.५८ मीटर) यांनी अनुक्रमे रौप्य व कांस्यपदक पटकावत कौतुकास्पद कामगिरी केली.
महिलांच्या २०० मीटर धावण्याच्या शर्यतीत भारताच्या आशा रॉय, दुती चांद व श्रावणी नंदा या तीन खेळाडूंचा समावेश होता. त्यामुळे पदक मिळविण्याबाबत भारत दावेदार होता. कझाकिस्तानच्या व्हिक्टोरिया शाकिरा हिने २३.६२ सेकंदांत ही शर्यत जिंकली. तिच्यापाठोपाठ आशा रॉय (२३.७१ सेकंद) व दुती चांद (२३.८२ सेकंद) यांनी ही शर्यत पार केली. आशाचे या स्पर्धेतील पहिलेच पदक आहे. याविषयी आशा म्हणाली, ‘‘पावसामुळे सुवर्णवेध साधता आला नाही. शर्यत सुरू होण्यास तांत्रिक कारणास्तव वेळ लागला त्याचाही परिणाम माझ्या कामगिरीवर झाला. २३.५९ सेकंद ही माझी सर्वोत्तम वेळ आहे.’’
महिलांच्या ८०० मीटर धावण्याच्या शर्यतीत सुवर्णपदकाची दावेदार असलेल्या टिंटू लुका या भारतीय खेळाडूला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. शर्यतीत ७०० मीटरपर्यंत तिच्याकडे आघाडी होती, मात्र नंतर चीनच्या वांग चुनयू हिने तिला मागे टाकून आघाडी घेतली व ती शेवटपर्यंत टिकविली. तिला हे अंतर पार करण्यास २ मिनिटे २.४७ सेकंद वेळ लागला. बहारिनच्या रेगासा शुमी हिने शेवटच्या ३० मीटरमध्ये टिंटूला मागे टाकून रौप्यपदक (२ मिनिटे ४.१६ सेकंद) जिंकले. टिंटूने ही शर्यत २ मिनिटे ४.४८ सेकंदात पार केले.
शर्यतीनंतर ती म्हणाली, ‘‘पावसाचा थोडासा त्रास झाला. त्यामुळे मला शेवटच्या १०० मीटर अंतरात वेग वाढविता आला नाही.’’
पुरुषांच्या २०० मीटर शर्यतीत चीनच्या झेई झेनयेई (२०.८७ सेकंद) याने सुवर्णपदक जिंकले तर महंमद फहाद (सौदी अरेबिया) व केई तकाशी (जपान) यांना अनुक्रमे रौप्य व कांस्यपदक मिळाले. ८०० मीटर धावण्यामध्ये कतारच्या मुसाब अब्देलीरहेमान (एक मिनिट ४६.९२ सेकंद) याने सोनेरी कामगिरी केली. लदान अब्दुलाझिझ (सौदी अरेबिया) व बिलाल अली (बहारिन) यांनी अनुक्रमे रौप्य व कांस्यपदक मिळविले. भारताच्या मनजितसिंगला चौथे स्थान मिळाले. महिलांची ४०० मीटर अडथळा शर्यतीत जपानच्या सातोमी कुबोकुरा (५६.८२ सेकंद) व मनामी किरा (५७.७८ सेकंद) यांनी अनुक्रमे सुवर्ण व रौप्यपदक जिंकले. दक्षिण कोरियाच्या जो युआन जु हिने कांस्यपदक मिळविले.

कविता उतरलीच नाही!
महिलांच्या पाच हजार मीटर शर्यतीत महाराष्ट्राची कविता राऊत सहभागी होणार की नाही, याबाबत उत्सुकता होती. मात्र शर्यतीच्या प्रारंभी ती दिसली नाही, त्यामुळे प्रेक्षकांची निराशा झाली.

पदकतक्ता
क्र.    देश    सुवर्ण    रौप्य    कांस्य    एकूण
१.    चीन    १६    ६    ५    २७
२.     बहारीन    ५    ७    ३     १५
३.     जपान    ४    ६    १०    २०
४.     सौदी अरेबिया    ४    २     १    ७
५.    उजबेकिस्तान    ३    ४    १    ८
६.     भारत    २    ६    ९    १७
७.     कझाकिस्तान     २    १    २    ५  
८.     यूएई       २    १    ०    ३
९.     कतार     १    २    १    ४
१०.     थायलंड    १    ०    २    ३

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 8, 2013 12:10 pm

Web Title: chak de india final day indian athletes rain down medals gains gold in women relay
Next Stories
1 अजित चंडीलानेच बुकींशी ओळख करुन दिली – हरमित सिंगची कबुली
2 वेटेल अजिंक्य
3 ब्रायन बंधूंचे विक्रमी जेतेपद
Just Now!
X