जागतिक बॅडमिंटनविश्वातील आव्हानात्मक खेळाडू शियान वांगला तिसऱ्या फेरीत नमवत दिमाखदार विजय मिळवणाऱ्या पी. व्ही. सिंधूला चौथ्या फेरीत मात्र पराभवाला सामोरे जावे लागले. सिंधूच्या पराभवामुळे आशियाई अजिंक्यपद बॅडिमटन स्पर्धेतील भारताचे आव्हान संपुष्टात आले आहे.
जपानच्या ईरिको हिरोसेने सिंधूला २१-१९, १६-२१, २१-११ असे नमवले. परंतु बिगरमानांकित सिंधूने सातव्या मानांकित हिरोसेला विजयासाठी चांगलेच झुंजवले
शियान वांगला नमवून आत्मविश्वास उंचावलेल्या सिंधूने पहिल्या आणि दुसऱ्या गेममध्ये जोरदार संघर्ष केला. मात्र तिसऱ्या सेटमध्ये हिरोसेने बाजी मारत उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली.
पहिल्या गेममध्ये मुकाबला १०-१० असा बरोबरीत होता. त्यानंतर हिरोसेने सलग चार गुणांची कमाई करत १४-१० अशी आगेकूच केली. याला तात्काळ प्रत्युत्तर देत सिंधूनेही सलग चार गुण पटकावले. पुन्हा एकदा हिरोसेने सरशी साधत १७-१६ अशी आघाडी पटकावली आणि त्यानंतर सलग तीन गुण मिळवत गेम पॉइंट प्राप्त केला. मात्र सिंधूनेही शानदार खेळ करत तीन गेम पॉइंट्स वाचवले आणि मुकाबला १९-२० असा नेला. मात्र आणखी एक गेम पॉइंट वाचवताना तिच्या हातून चुका झाल्या आणि हिरोसेने पहिल्या गेमवर कब्जा केला.
दुसऱ्या गेममध्ये हिरोसेने ८-४ अशी आघाडी घेत आगेकूच केली. मात्र सिंधूने जोरदार मुसंडी मारत मुकाबला १४-१४ असा बरोबरीत नेला. यानंतर सलग पाच गुण पटकावत सिंधूने १९-१४ अशी भक्कम आघाडी घेतली. या आघाडीच्या बळावर वाटचाल करत सिंधूने दुसरा गेम जिंकत १-१ अशी बरोबरी केली.
तिसऱ्या आणि निर्णायक गेममध्येही मुकाबला अटीतटीचा होता. ५-५ अशा बरोबरीच्या स्थितीतून हिरोसेने सातत्याने आघाडी वाढवली. मात्र थकलेली सिंधू फारसा प्रतिकार करू शकली नाही. तिला बरोबरीच्या स्थितीनंतर केवळ सहा गुण मिळवता आले आणि हिरोसेने तिसरा गेम २१-११ असा सहजतेने जिंकत सामनाही जिंकला.