राजस्थानसमोर आव्हान पंजाबचे

राजस्थान रॉयल्सची एकीकडे ‘प्ले-ऑफ’ फेरीत मजल मारण्यासाठी धडपडत असताना किंग्स इलेव्हन पंजाब संघ अनपेक्षित कामगिरी साकारत आहे. त्यामुळे धोकादायक पंजाबचा त्यांच्याच घरच्या मैदानावर सामना करताना राजस्थानला ‘सावध ऐका पुढल्या हाका’ हे लक्षात ठेवूनच खेळ करावा लागणार आहे.

अनुभवी खेळाडू राहुल द्रविडच्या नेतृत्वाखालील राजस्थान रॉयल्सने १२ सामन्यांत आठ विजय मिळवून गुणतालिकेत तिसऱ्या क्रमांकावर मजल मारली आहे. पंजाबचे १० गुण झाले असून ‘प्ले-ऑफ’ फेरीच्या शर्यतीतील त्यांचे स्थान कायम आहे.

 रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्धच्या गेल्या सामन्यात सहा विकेट्सनी थरारक विजय मिळवणाऱ्या पंजाबचा आत्मविश्वास कमालीचा उंचावला आहे. पंजाब हरणार असे एका क्षणी वाटत असतानाच दक्षिण आफ्रिकेच्या डेव्हिड मिलरने झंझावाती खेळी करून बंगळुरूचे १९१ धावांचे आव्हान सहज पार करून पंजाबला विजय मिळवून दिला. ३८ चेंडूत नाबाद १०१ धावांची घणाघाती खेळी केल्यामुळेच पंजाबच्या चाहत्यांनी त्याचे ‘किलर, मिलर’ असे नामकरण केले. याआधी त्याने पुणे वॉरियर्सविरुद्ध ४१ चेंडूंत ८० धावांची खेळी साकारली होती. मिलरसह शॉन मार्श तसेच डेव्हिड हसी यांच्यावर पंजाबच्या फलंदाजीची भिस्त आहे. कर्णधार अ‍ॅडम गिलख्रिस्टची कामगिरी चांगली होत नसल्याने डेव्हिड हसी पंजाबचे नेतृत्व सांभाळत आहे. घरच्या मैदानावर खेळताना पंजाबचा संघ तुल्यबळ वाटत असला तरी बलाढय़ राजस्थानवर विजय मिळवताना त्यांना कामगिरीत सुधारणा करावी लागणार आहे. गोलंदाजीत प्रवीण कुमार चांगलाच प्रभावी ठरला असून परविंदर अवाना आणि लेगस्पिनर पीयूष चावला विकेट्स मिळवण्यात यशस्वी ठरले आहेत.

गेल्या सामन्यात दिल्ली डेअरडेव्हिल्सवर नऊ विकेट्सनी सहज विजय मिळवणारा राजस्थानचा संघही तुफान फॉर्मात आहे. ४० वर्षीय द्रविड अजिंक्य रहाणेसह संघाला चांगली सुरुवात करून देत आहे. दोन्ही सलामीवीरांनी दिल्लीविरुद्ध अर्धशतकी खेळी करत राजस्थानच्या विजयाची पायाभरणी केली होती. अष्टपैलू खेळाडू शेन वॉटसन तसेच संजू सॅमसन आणि स्टुअर्ट बिन्नी यांचेही राजस्थानच्या विजयात उपयुक्त योगदान मिळत आहे. ब्रॅड हॉज आणि दिशांत याज्ञिक यांच्या समावेशामुळे राजस्थानची फलंदाजी मजबूत बनली आहे.  गोलंदाजीत जेम्स फॉकनरने आतापर्यंत १८ बळी मिळवले आहेत. सनरायजर्स हैदराबादविरुद्ध त्याने पाच विकेट्स मिळवण्याची किमया केली होती. त्याला सिद्धार्थ त्रिवेदी आणि बिन्नीची चांगली साथ लाभत आहे. अजित चांडिला आणि प्रवीण तांबे या फिरकीपटूंना पंजाबचे फलंदाज कसे उत्तर देतात, यावर सर्वाचे लक्ष लागून राहिले आहे. राजस्थानने या सामन्यात विजय मिळवल्यास, त्यांच्या ‘प्ले-ऑफ’ फेरीतील प्रवेशाला बळकटी मिळणार आहे.

स्थळ : पंजाब क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, मोहाली

वेळ : दुपारी ४ वाजल्यापासून.