भारत-न्यूझीलंड ट्वेन्टी-२० मालिका

आज न्यूझीलंडविरुद्ध अखेरचा ट्वेन्टी-२० सामना

मालिका गमावल्यानंतर किमान अखेरचा ट्वेन्टी-२० सामना जिंकून प्रतिष्ठा जपण्याचे आव्हान भारतीय महिला संघापुढे असेल. रविवारी होणाऱ्या तिसऱ्या सामन्यात फलंदाजांच्या कामगिरीत सुधारणा होईल, अशी कर्णधार हरमनप्रीत कौरची अपेक्षा आहे.

एकदिवसीय मालिकेत २-१ अशा विजयानंतर ट्वेन्टी-२० मालिकेत भारतीय संघ ०-२ असा पिछाडीवर आहे. पहिला सामना भारताने २३ धावांनी गमावला, तर दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंडने चार गडी राखून विजय मिळवला. या दोन्ही सामन्यांत धावांचा पाठलाग आणि प्रथम फलंदाजी करताना भारताला १४० धावांचा टप्पा गाठण्यातसुद्धा अपयश आले आहे.

विश्वचषकासाठी संघबांधणी

२०२० मध्ये होणाऱ्या आयसीसी विश्वचषक ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पर्धेसाठी संघबांधणी करण्याच्या दृष्टीने भारतीय संघातून अनुभवी मिताली राजला वगळण्यात आले आहे. त्यामुळे भारतीय फलंदाजी डळमळीत झाली आहे. याबाबत हरमनप्रीत म्हणाली, ‘‘आम्ही संघबांधणी करीत आहोत. त्यामुळे आज अडचणी येत आहेत. मात्र युवा खेळाडूंना अनुभव मिळाल्यानंतर कामगिरी उंचावेल.’’

हरमनप्रीतसुद्धा अपयशी

पहिल्या दोन्ही सामन्यांत स्मृती मानधना आणि जेमिमा रॉड्रिग्ज यांनी दिमाखदार फटकेबाजी केली. मात्र हरमनप्रीतला आपल्या दर्जाला साजेशी फलंदाजी दाखवता आलेली नाही. पहिल्या दोन्ही सामन्यांत तिने अनुक्रमे १७ आणि ५ धावा केल्या आहेत. मधल्या फळीतील फलंदाजांना झुंजार कामगिरी दाखवण्यात अपयश आले. नवख्या प्रियांका पुनियामध्ये अनुभवाची कमतरता आहे. याविषयी हरमनप्रीत म्हणाली, ‘‘आम्ही मालिका गमावली असली तरी बरेच काही शिकलो आहे. संघातील मोजक्या खेळाडूंनी ३०हून अधिक सामने खेळले आहेत, तर बहुतांशी खेळाडूंकडे १० ट्वेन्टी-२० सामन्यांपेक्षा कमी अनुभव आहे.’’

दीप्ती शर्माची भूमिका काय?

ऑफ-स्पिनर दीप्ती शर्माची नेमकी भूमिका काय, हेसुद्धा भारतीय संघ अद्याप निश्चित करू शकला नाही. डावखुरी फिरकी गोलंदाज राधा यादवप्रमाणे ती फलंदाजांना जखडून ठेवत नाही, तसेच लेग-स्पिनर पूनम यादवप्रमाणे आक्रमक पर्याय नाही. अखेरच्या षटकांमध्ये ती संघाला तारणारी खेळी साकारण्यातसुद्धा अपयशी ठरते. मागील दोन वर्षांतील तिची निराशाजनक कामगिरी हेच सिद्ध करते आहे. दीप्तीचा योग्य पर्याय संघाकडे नाही का, हा प्रश्नसुद्धा क्रिकेटवर्तुळात विचारला जात आहे.

न्यूझीलंडच्या फलंदाजीची धुरा बेट्सवर

एकदिवसीय मालिका गमावल्यानंतर न्यूझीलंडने ट्वेन्टी-२० मालिका जिंकण्याच्याच ईर्षेने खेळ केला आहे. अखेरच्या एकदिवसीय सामन्यात ५७ धावांची खेळी साकारणाऱ्या अनुभवी सुझी बेट्सने दुसऱ्या ट्वेन्टी-२० सामन्यात सामना जिंकून देणाऱ्या ६२ धावा केल्या होत्या. तिच्यावरच किवी संघाची प्रमुख मदार असेल.

संघ

भारत : हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना, मिताली राज, जेमिमा रॉड्रिग्ज, दीप्ती शर्मा, तानिया भाटिया, पूनम यादव, राधा यादव, अनुजा पाटील, एकता बिश्त, दयालन हेमलता, मानसी जोशी, अरुंधती रेड्डी, शिखा पांडे, प्रिया पुनिया.

न्यूझीलंड : अ‍ॅमी सॅटर्थवेट (कर्णधार), सुझी बेट्स, बर्नाडिन बेझुडेनहॉट, सोफी डीव्हाइन, हायले जेन्सन, कॅटलिन गुरी, लेग कास्पेरीक, अ‍ॅमेलिया कीर, फ्रान्सिस मॅकाय, कॅटी मार्टिन, रोसमेरी मायर, हनाह रॉवे, लीआ ताहूहू.

सामन्याची वेळ : सकाळी ७.३० वा.

थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १.