भारत-बांगलादेश क्रिकेट मालिका

नवी दिल्लीतील प्रदूषित वातावरणात पहिल्या सामन्यात पराभव पत्करल्यानंतर गुरुवारी राजकोटवर रंगणाऱ्या दुसऱ्या ट्वेन्टी-२० क्रिकेट सामन्यात भारतीय संघापुढे दुहेरी आव्हान असणार आहे. राजकोटमध्ये चक्रीवादळाची शक्यता असल्याने यावेळीसुद्धा आव्हानात्मक परिस्थितीतच भारताला मालिकेतील आव्हान कायम राखण्यासाठी लढाऊ बांगलादेशला नमवण्याचे शिवधनुष्य पेलावे लागणार आहे.

अरुण जेटली स्टेडियमवर रविवारी झालेल्या प्रथम लढतीत अनुभवी मुशफिकुर रहिमने केलेली जिगरबाज अर्धशतकी खेळी आणि फिरकीपटू अमिनूल इस्लाम व अफिफ हुसैन यांच्या दमदार गोलंदाजीच्या बळावर बांगलादेशने भारताला सात गडी राखून धूळ चारून तीन सामन्यांच्या मालिकेत

१-० अशी आघाडी घेतली. बांगलादेशने भारताविरुद्ध ट्वेन्टी-२० सामन्यांत मिळवलेला हा पहिलाच विजय ठरला.

भारताचा प्रभारी संघनायक रोहित शर्मा सातत्याने धावांचा वर्षांव करीत आहे. नुकत्याच झालेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतील कामगिरीप्रमाणेच ट्वेन्टी-२० मालिकेतही तो प्रभाव पाडण्यासाठी उत्सुक आहे. पहिल्या लढतीत त्याला अपयश आले असले तरी तो दुसऱ्या सामन्यात त्याची परतफेड करेल, अशी आशा आहे. ऑस्ट्रेलियामधील ट्वेन्टी-२० विश्वचषकाआधी भारताला जवळपास १५ ते २० सामने खेळायचे असून, याद्वारे समतोल संघ तयार करण्याचे आव्हान त्यांच्यापुढे असेल.

वेगवान गोलंदाजांकडे अनुभवाचा अभाव

भारताच्या गोलंदाजीच्या माऱ्यात अनुभवाचा अभाव आहे. याचाच फटका भारताला पहिल्या लढतीत पडला. खलिल अहमद, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर दडपणाखाली अचूक टप्प्यावर गोलंदाजी करण्यात अपयशी ठरले. त्यामुळे दुसऱ्या लढतीत संघात बदल होण्याची शक्यता बळावली आहे. परंतु यजुर्वेद्र चहल आणि दीपक चहर यांनी बऱ्यापैकी कामगिरी केली.

पंतकडून दमदार कामगिरीची आशा

डावखुरा युवा फलंदाज आणि यष्टिरक्षक ऋषभ पंत सातत्याने दोन्ही विभागांत अपयशी ठरत आहे. त्यामुळे या सामन्यात फलंदाजीत पंतने छाप न पाडल्यास संजू सॅमसनसाठी संघाचे दरवाजे खुले होऊ शकतात. त्याशिवाय रिव्ह्य़ू घेण्याच्या त्याच्या क्षमतेवरसुद्धा अनेक प्रश्नचिन्हे उभी ठाकली आहेत.

मधल्या फळीतील स्पर्धा तीव्र

भारताच्या फलंदाजीच्या मधल्या फळीतील स्पर्धा तीव्र आहे. लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, कृणाल पंडय़ा आणि शिवम स्थान बळकट करण्यासाठी उत्सुक आहेत. मुंबईकर शिवमला पदार्पणात छाप पाडता आली नाही. परंतु गरजेवेळी मोठे फटके मारून सामन्याचे रूप पालटण्याची क्षमता त्याच्याकडे आहे.

मुशफिकुर, महमदुल्ला यांच्यावर बांगलादेशची भिस्त

शाकिब अल हसनच्या अनुपस्थितीतही बांगलादेशचा संघ डगमगला नसल्याचे पहिल्या लढतीद्वारे स्पष्ट झाले. कर्णधार महमदुल्ला रियादच्या नेतृत्वाखाली बांगलादेशने भरारी घेतली आहे. रहिम आणि सौम्य सरकार यांच्यावर बांगलादेशच्या फलंदाजीची भिस्त आहे. तर गोलंदाजीत इस्लाम व हुसैन या फिरकी जोडीवर त्यांची मदार आहे.

‘माहा’ चक्रीवादळाचे सामन्यावर सावट

दुसऱ्या ट्वेन्टी-२० सामन्यावर ‘माहा’ या चक्रीवादळाचे सावट आहे. हे वादळ गुजरात किनाऱ्याच्या दिशेने मार्गक्रमण करत असल्याने हा सामना होणार का, असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. हे वादळ भारताच्या पश्चिम किनारपट्टीपासून दूर जाणार होते, मात्र अचानक या वादळाने दिशा बदलली आहे. त्यामुळे गुजरात आणि पालघर पट्टय़ातील सर्व यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. विख्यात क्रिकेट समालोचक हर्ष भोगले यांनीही याबद्दल चिंता व्यक्त केली आहे.

१०

श्रेयस अय्यरला (९९० धावा) २०१९ या वर्षांतील ट्वेन्टी-२०मध्ये १,००० धावांचा टप्पा गाठण्यासाठी फक्त १० धावांची आवश्यकता आहे.

ऋषभ पंतला (४९ झेल) ट्वेन्टी-२० सामन्यांतील ५० झेलचा टप्पा गाठण्यासाठी एका झेलची आवश्यकता आहे.

बांगलादेशचा कर्णधार महमदुल्ला रियादला ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये ५० षटकारांचा आकडा गाठण्यासाठी आणखी दोन षटकारांची गरज आहे.

संघ

भारत : रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, मनीष पांडे, कृणाल पंडय़ा, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, दीपक चहर, राहुल चहर, यजुर्वेद्र चहल, संजू सॅमसन, खलिल अहमद.

बांगलादेश : महमदुल्ला रियाद (कर्णधार), तैजूल इस्लाम, मोहम्मद मिथुन, लिटन दास, सौम्य सरकार, नैम शेख, मुशफिकर रहिम, अफिफ हुसैन, मोसादीक हुसेन सैकत, अमिनूल इस्लाम, अराफत सन्नी, अबू हैदर, अल-अमिन हुसैन, मुस्तफिझूर रेहमान, शफिऊल इस्लाम.

*  सामन्याची वेळ : सायंकाळी ७ वा.

* थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १ आणि स्टार स्पोर्ट्स १ हिंदी