विश्वचषक क्रिकेट स्पर्धेची उपांत्य फेरी गाठणे, हे वेस्ट इंडिजसाठी खडतर आव्हान आहे, अशी कबुली कर्णधार जेसन होल्डरने दिली आहे. सोमवारी झालेल्या सामन्यात बांगलादेशने विंडीजचा सात गडी राखून पराभव केला.

विश्वचषकाच्या इतिहासातील दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वोच्च धावसंख्येचा पाठलाग बांगलादेशने यशस्वीपणे केला. बांगलादेशने ८.३ षटके राखून ३ बाद ३२२ धावसंख्या गाठली. ढिसाळ क्षेत्ररक्षण आणि खराब गोलंदाजीचा फटका विंडीजला बसला.

विश्वचषकातील आतापर्यंतच्या पाच सामन्यांपैकी वेस्ट इंडिजने तीन सामने गमावले आहेत. यानंतर अजून चार सामने त्यांचे खेळायचे बाकी आहेत. त्यामुळे १० संघांच्या या स्पर्धेत उपांत्य फेरी गाठण्याच्या अंधुक आशा शिल्लक आहेत, असे होल्डरने सांगितले.

‘‘सध्या तरी उपांत्य फेरीत स्थान मिळवणे कठीण दिसते आहे. परंतु अशक्य मुळीच नाही. आता प्रत्येक सामना हा अंतिम फेरीचा असल्याप्रमाणेच आम्ही खेळू. पुढील चारही सामने जिंकल्यास उपांत्य फेरी गाठता येऊ शकेल,’’ असा विश्वास होल्डरने व्यक्त केला. न्यूझीलंड आणि भारताचे संघ विश्वचषकात अपराजित राहिले आहेत आणि विंडीजचे पुढील दोन सामने याच दोन बलाढय़ संघांविरुद्ध होणार आहेत.