जेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानला जाणारा बायर्न म्युनिक आणि ला लीगा फुटबॉल स्पर्धेचे जेतेपद पटकावण्यासाठी उत्सुक असलेल्या अ‍ॅटलेटिको माद्रिद या संघांनी चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पर्धेत आपली घोडदौड कायम राखली. बायर्न म्युनिकने अर्सेनलशी १-१ अशी बरोबरी साधत ३-१ अशा गोलफरकाच्या आधारावर उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. अ‍ॅटलेटिको माद्रिदने एसी मिलानचा पराभव करून १७ वर्षांनंतर पहिल्यांदा चॅम्पियन्स लीगच्या उपांत्यपूर्व फेरीत मजल मारली.
पहिल्या टप्प्यातील सामन्यात बायर्न म्युनिकने अर्सेनलवर २-० असा विजय मिळवला होता. त्यामुळे उपांत्यपूर्व फेरीत आगेकूच करण्यासाठी बायर्न म्युनिकचे पारडे जड मानले जात होते. पहिल्या सामन्यातील पराभवामुळे अर्सेनलचे प्रशिक्षक अर्सेन वेंगर यांनी संघात सहा बदल केले होते. दुसऱ्या सत्रात बास्टियन श्वाइनस्टायगर याने गोल करत बायर्न म्युनिकला आघाडीवर आणले. त्यानंतर लुकास पोडोलस्की याने गोल करत अर्सेनलला बरोबरी साधून दिली. मात्र अर्सेनलला पहिल्या टप्प्यातील पिछाडी भरून काढता न आल्याने बाहेरचा रस्ता धरावा लागला. गेल्या मोसमातही अर्सेनलला बायर्न म्युनिककडून उपांत्यपूर्व फेरीत गारद व्हावे लागले होते.
दिएगो कोस्टा याने केलेल्या दोन गोल्सच्या बळावर अ‍ॅटलेटिको माद्रिदने एसी मिलानवर ४-१ अशी मात केली. या मोसमात प्रशिक्षक दिएगो सिमोन यांच्या नेतृत्वाखाली अ‍ॅटलेटिकोची कामगिरी चांगलीच सुधारली आहे. १९९७नंतर पहिल्यांदा चॅम्पियन्स लीगची उपांत्यपूर्व फेरी गाठणारा अ‍ॅटलेटिको माद्रिद संघ ला लीगा स्पर्धेच्या जेतेपदाच्या शर्यतीत आघाडीवर आहे. कोस्टाने तिसऱ्याच मिनिटाला अ‍ॅटलेटिको माद्रिदचे खाते खोलल्यानंतर २७व्या मिनिटाला काकाने गोल करत एसी मिलानला बरोबरी साधून दिली. ४०व्या मिनिटाला अर्डा तुरान याने अ‍ॅटलेटिकोसाठी दुसऱ्या गोलाची भर घातली. दुसऱ्या सत्रात राऊल गार्सिया (७१व्या मिनिटाला) आणि कोस्टा (८५व्या मिनिटाला) यांनी गोल करत अ‍ॅटलेटिको माद्रिदला सहज विजय मिळवून दिला.