युरोपियन फुटबॉलचा नवीन राजा बायर्न म्युनिक ठरला आहे. रविवारी चॅँपियन्स लीगचे विजेतेपद पटकावून बायर्न म्युनिकने युरोपातील फुटबॉलवर सध्या त्यांचे वर्चस्व असल्याचे सिद्ध केले. अंतिम फेरीत त्यांनी पॅरिस सेंट- जर्मेनचा १-० पराभव केला. याबरोबरच प्रथमच चॅम्पियन्स लीगचे विजेतेपद पटकावण्याची पीएसजीची संधी हुकली.

यंदा नेयमार, एम्बापे, डी मारिया यासारख्या अव्वल खेळाडूंना करारबद्ध करून पॅरिस सेंट-जर्मेनने यंदा ५० कोटी डॉलर्सहून अधिक खर्च केला होता. मात्र तिघेही अंतिम फेरीत गोल करण्यात पूर्णपणे अपयशी ठरले. याउलट पॅरिसमध्ये जन्मलेला २४वर्षीय किंगस्ले कोमनने ५९व्या मिनिटाला गोल करत बायर्न म्युनिकच्या विजयात योगदान दिले. बायर्न ११ चॅँपियन्स लीग लढती एका हंगामात जिंकणारा पहिला संघ ठरला. करोनामुळे चॅम्पियन्स लीगची अंतिम फेरी तीन महिने उशीरा खेळण्यात आली. मात्र बायर्नने करोनाकाळात फुटबॉलला सुरुवात झाल्यावर सुरुवातीपासून कामगिरीवर कोणताही परिणाम झाला नसल्याचे पावलोपावली सिद्ध केले. प्रेक्षकांशिवाय सर्व लढती होऊनही बायर्नने कामगिरीवर परिणाम होत नसल्याचे दाखवून दिले. यंदाच्या हंगामात लयीत असणाऱ्या रॉबर्ट लेवानडोस्कीला मात्र गोल करता आला नाही.

पॅरिस सेंट -जर्मेनच्या पराभव सहन न झाल्याने हजारो चाहत्यांनी रस्त्यावर उतरून धिंगाणा केला.

बायर्नचे वर्षांतील तिसरे विजेतेपद

बायर्नने या हंगामात बुंडेसलिगा आणि जर्मन चषक या देशांतर्गत फुटबॉल स्पर्धा जिंकल्या आहेत. बुंडेसलिगा सलग आठव्यांदा बायर्नने पटकावला आहे. चॅम्पियन्स लीग सहावेळा जिंकणारा बायर्न हा लिव्हरपूलनंतर पहिला संघ ठरला. याआधी एसी मिलानने सातव्यांदा आणि रेयाल माद्रिदने सर्वाधिक १३वेळा ही स्पर्धा जिंकली आहे. बायर्नने सर्व स्पर्धामध्ये मिळून ३० लढतींमध्ये पराभव पत्करलेला नाही. त्यातील २१ लढतींमध्ये त्यांनी विजय नोंदवला आहे.