मेसीच्या जादूविनादेखील बार्सिलोनाची यशस्वी वाटचाल कायम

 अ‍ॅमस्टरडॅम : ख्रिस्तियानो रोनाल्डोने केलेल्या एका शानदार गोलमुळे युव्हेंटसने चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीच्या पहिल्या टप्प्यातील आयएक्सविरुद्धची लढत १-१ अशी बरोबरीत सोडवली.

मांडीच्या दुखापतीतून सावरल्यानंतर थाटात पुनरागमन करणाऱ्या रोनाल्डोने हवेत सूर घेत हेडरद्वारे गोल नोंदवला आणि योहान क्रफ स्टेडियमवरील जवळपास ५० हजारपेक्षा जास्त चाहत्यांसमोर त्याने आपल्या महानतेची झलक दाखवली. यामुळे रोनाल्डोची चॅम्पियन्स लीगमधील गोलसंख्या ही १२५ इतकी झाली आहे, तर या मैदानावरील रोनाल्डोचा हा सहावा गोल ठरला आहे.

दुसऱ्या सत्राच्या सुरुवातीलाच आयएक्सचा ब्राझीलचा आघाडीवीर डेव्हिड नेरेस याने गोल करत सामना १-१ अशा बरोबरीत आणला. आता पुढील मंगळवारी होणाऱ्या परतीच्या सामन्यात घरच्या मैदानावर युव्हेंटसचे पारडे जड मानले जात आहे. या सामन्यात विजयी ठरणाऱ्या संघाला उपांत्य फेरीत मँचेस्टर सिटी किंवा टॉटेनहॅम हॉट्स्परशी भिडावे लागेल.

‘‘कमी कालावधीत पुनरागमन केल्याचा आणि प्रतिष्ठेच्या स्पर्धेत शानदार गोल केल्याचा आनंद होत आहे. युव्हेंटसने अखेपर्यंत सांघिक खेळाचे प्रदर्शन केले,’’ असे रोनाल्डोने सामन्यानंतर सांगितले.

युव्हेंटसचे प्रशिक्षक मॅसिमिलानो अलेग्री यांनी रोनाल्डोची स्तुती केली आहे. ते म्हणाले, ‘‘आपण एका वेगळ्याच उंचीवर पोहाचलो आहोत, हे रोनाल्डोने दाखवून दिले. गोल करण्याची त्याची पद्धत, वेळ, मैदानावरील वावर हा अन्य फुटबॉलपटूंपेक्षा वेगळाच असतो. त्यामुळे रोनाल्डोला रोखणे प्रतिस्पध्र्याना शक्य होत नाही.’’

 

मँचेस्टर युनायटेडवर बार्सिलोनाचा विजय

मँचेस्टर : लिओनेल मेसीला आपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नसली तरी बार्सिलोनाने चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीच्या पहिल्या टप्प्यात मँचेस्टर युनायटेडवर १-० असा विजय मिळवत उपांत्य फेरीसाठी आपली दावेदारी मजबूत केली आहे.

ल्युक शॉ याच्या स्वयंगोलमुळे १२व्या मिनिटाला बार्सिलोनाने खाते खोलले. त्यानंतर बार्सिलोनाने गोल करण्याच्या अनेक संधी वाया घालवल्या. मँचेस्टर युनायटेडला या सामन्यात आपला खेळ उंचावता न आल्याने सामन्याच्या सुरुवातीलाच झालेला स्वयंगोल बार्सिलोनाच्या विजयात महत्त्वपूर्ण ठरला.

मँचेस्टर युनायटेडचे नवनियुक्त प्रशिक्षक ओले गनर सोलस्कायर यांनी संघाच्या कामगिरीचे कौतुक केले असले तरी गोल करण्याच्या संधी निर्माण करण्यात अपयशी ठरल्याने युनायटडेला पराभव स्वीकारावा लागला. पहिल्या सत्रात युनायटेडच्या दिओगो डलोट याने हेडरद्वारे मारलेला फटका गोलजाळ्याच्या बराच बाजुने गेला. मात्र २००५ नंतर प्रथमच मँचेस्टर युनायटेडला गोल करण्यासाठी एकही फटका लगावता आला नाही. आता उपांत्य फेरीत मजल मारण्यासाठी मँचेस्टर युनायटेडला पॅरिस सेंट जर्मेनविरुद्धच्या कामगिरीची पुनरावृत्ती करावी लागेल. दोन गोलने पिछाडीवर असतानाही युनायटेडने पॅरिस सेंट जर्मेनला ४-२ असे हरवून उपांत्यपूर्व फेरी गाठली होती.

बार्सिलोनाने मात्र सातत्याने युनायटेडच्या बचावपटूंवर दडपण आणत गोलरक्षक डेव्हिड डे गियाला संकटात आणले. मात्र डे गियाने फिलिपे कुटिन्हो आणि मेसी यांचे प्रयत्न हाणून पाडले. बार्सिलोनाच्या खेळाडूंनाही दर्जेदार खेळ करता आला नसला तरी विजयामुळे त्यांचे उपांत्य फेरीत पोहोचण्याच्या आशा उंचावल्या आहेत.

‘‘प्रत्येक सामन्यात सकारात्मक आणि नकारात्मक बाजू असतात. कामगिरी खराब झाल्याने आम्ही निराश आहोत. बार्सिलोनाच्या गोलनंतर आम्ही चांगला खेळ केला. मेसी आणि लुइस सुआरेझच्या उत्कृष्ट चाल रचत आमच्या गोलक्षेत्रात मुसंडी मारली. सुआरेझच्या हेडरवर चेंडू ल्युक शॉला स्पर्श करून गोलजाळ्यात गेला,’’ असे युनायटेडचे प्रशिक्षक सोलस्कायर यांनी सांगितले.