वॉशिंग्टन : ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या युव्हेंटसला चॅम्पियन्स लीग फुटबॉलच्या मंगळवारी मध्यरात्री होणाऱ्या पोटरेविरुद्धच्या उपउपांत्यपूर्व फेरीच्या दुसऱ्या टप्प्यातील सामन्यात विजय अनिवार्य आहे.

फेब्रुवारीत झालेल्या पहिल्या टप्प्यातील सामन्यात युव्हेंटसला १-२ असा पराभव पत्करावा लागला. परंतु प्रतिस्पर्धी संघाच्या मैदानावर गोल केल्याचा त्यांना लाभ होऊ शकतो. त्यामुळे युव्हेंटसने १-० अशा फरकाने सामना जिंकला तरी ते उपांत्यपूर्व फेरीतील स्थान पक्के करू शकतात. मंगळवारीच होणाऱ्या अन्य लढतीत सेव्हिया आणि बोरुशिआ डॉर्टमंड यांची गाठ पडणार असून पहिल्या टप्प्यातील सामन्यात डॉर्टमंडने ३-२ असा विजय मिळवला आहे.

इंग्लिश प्रीमियर लीग फुटबॉल : मँचेस्टर सिटी, लिव्हरपूल पराभूत

मँचेस्टर : इंग्लिश प्रीमियर लीग फुटबॉलमध्ये रविवारी झालेल्या सामन्यांमध्ये अग्रस्थानावरील मँचेस्टर सिटी आणि गतविजेता लिव्हरपूल या संघांना पराभवाला सामोरे जावे लागले. ब्रुनो फर्नाडिस आणि ल्युक शॉ यांनी केलेल्या प्रत्येकी एका गोलमुळे मँचेस्टर युनायटेडने मँचेस्टर सिटीला २-० असे पराभूत करून त्यांची सलग २१ विजयांची मालिका खंडित केली. दुसरीकडे मारिओ लॅमिनाच्या एकमेव गोलमुळे फुलहॅमने लिव्हरपूलला गेल्या पाच सामन्यांतील चौथा पराभव पत्करण्यास भाग पाडले. तूर्तास प्रत्येकी २८ सामन्यांतील ६५ गुणांसह सिटी पहिल्या, ५४ गुणांसह युनायटेड दुसऱ्या तर ४३ गुणांसह लिव्हरपूल आठव्या स्थानी आहे.

ला लिगा फुटबॉल : अग्रस्थानाच्या दिशेने बार्सिलोनाची आगेकूच

बार्सिलोना : जॉर्डी अल्बा आणि आयएक्स मोरिबा यांनी केलेल्या प्रत्येकी एका गोलच्या बळावर बार्सिलोनाने ला लिगा फुटबॉलमध्ये ओसासुनाला २-० असे नमवले. मेसीनेच दोन्ही गोलसाठी सहाय्य केले. या विजयामुळे बार्सिलोना २६ सामन्यांतील ५६ गुणांसह दुसऱ्या स्थानी पोहोचली असून अग्रस्थानावरील अ‍ॅटलेटिको माद्रिदपेक्षा ते तीन गुणांनी पिछाडीवर आहेत.