आयएलचे आव्हान संपुष्टात

पॅरिस : गतविजेते लिव्हरपूल आणि चेल्सी या संघांनी चॅम्पियन्स लीग फुटबॉलची उपउपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. मात्र आयएल संघाला गटसाखळीतच गाशा गुंडाळावा लागला आहे.

मंगळवारी गटांच्या अखेरच्या सामन्यांनंतर सहा संघांनी पहिल्या बाद फेरीसाठी आपले स्थान निश्चित केले आहे. ई-गटातून लिव्हरपूल विजेते आणि नॅपोलीला दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. परंतु आयएल आणि इंटर मिलानचे आव्हान संपुष्टात आले आहे.

जर्गन क्लॉप यांच्या मार्गदर्शनाखालील लिव्हरपूलला आव्हान टिकवण्यासाठी अखेरच्या सामन्यात बरोबरीची आवश्यकता होती. परंतु लिव्हरपूलने साल्झबर्गचा २-० असा पराभव केला. लिव्हरपूलकडून नॅबी केयटा आणि मोहम्मद सलाह यांनी गोल केले.

ह-गटात व्हॅलेन्सियाने आयएलचा १-० असा पराभव करीत गटाचे चित्र पालटले. रॉड्रिगो मोरेनोने हा विजयी गोल नोंदवला.

फॅटीचा ऐतिहासिक गोल

 मिलान : किशोरवयीन अंसू फॅटी चॅम्पियन्स लीग फुटबॉलमध्ये गोल नोंदवणारा सर्वात तरुण फुटबॉलपटू ठरला आहे. बार्सिलोनाकडून २-१ अशा फरकाने पराभव पत्करल्यामुळे इंटर मिलानचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे.

फ-गटातून चॅम्पियन्स लीगच्या बाद फेरीतील स्थान निश्चित करणाऱ्या बार्सिलोनाचे खाते २३ व्या मिनिटाला कार्लेस पेरेझने उघडले. मग ४४ व्या मिनिटाला रोमेलू लुकाकूने इंटर मिलानला बरोबरी साधून दिली. त्यामुळे पहिले सत्र १-१ असे बरोबरी संपले. मग सामन्याच्या उत्तरार्धात ८६ व्या मिनिटाला लुइस सुआरेझच्या क्रॉसवर फॅटीने नोंदवलेला गोल बार्सिलोनासाठी निर्णायक ठरला.