पॅरिस सेंट जर्मेनने सुरुवातीपासूनच दर्जेदार कामगिरीचे प्रदर्शन करत आरबी लेपझिग संघाचा ३-० असा पाडाव करत चॅम्पियन्स लीग फुटबॉलच्या अंतिम फेरीत पहिल्यांदाच धडक मारली.

चॅम्पियन्स लीगमधील तब्बल ११० सामन्यांमध्ये खेळल्यानंतर फ्रान्समधील अव्वल क्लब असलेल्या पॅरिस सेंट जर्मेनचे अंतिम फे रीत मजल मारण्याचे स्वप्न प्रत्यक्षात अवतरले. मार्किन्होज, अँजेल डी मारिया तसेच हुआन बेर्नाट वेलास्को यांनी केलेल्या गोलमुळे पॅरिस सेंट जर्मेनने उपांत्य फे रीच्या लढतीवर वर्चस्व गाजवले. पहिल्यांदाच चॅम्पियन्स लीगची उपांत्य फेरी गाठणाऱ्या लेपझिगविरुद्ध पॅरिस सेंट जर्मेनने सुरुवातीपासूनच सामन्यावर नियंत्रण मिळवले. अप्रतिम पासेस, मोकळ्या जागेतून धावत चेंडूला पुढे सरकावणे आणि लेपझिगच्या बचावफळीवर सातत्याने दडपण आणत पॅरिस सेंट जर्मेनने हा सामना सहज जिंकला.

मार्किन्होजने १३व्या मिनिटाला खाते खोलल्यानंतर अँजेल डी मारियाने ४२व्या मिनिटाला पॅरिस सेंट जर्मेनची आघाडी वाढवली. दुसऱ्या सत्राच्या सुरुवातीला हुआन बेर्नाट याने तिसरा गोल झळकावत संघाची आघाडी ३-०ने वाढवली. लेपझिगने खेळ उंचावण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना सामन्यात पुनरागमन करता आले नाही.

आता रविवारी मध्यरात्री रंगणाऱ्या अंतिम फे रीत पॅरिस सेंट जर्मेनला पाच वेळच्या विजेत्या बायर्न म्युनिक अथवा लिऑन यांच्यातील विजेत्याशी लढत द्यावी लागेल. पॅरिस सेंट जर्मेनने विजेतेपद मिळवले तर मार्साइलनंतर (१९९३) चॅम्पियन्स लीग जिंकणारा पॅरिस सेंट जर्मेन हा फ्रान्समधील दुसरा क्लब ठरेल.

नेयमारवर बंदी?

लेपझिगचा खेळाडू मार्सेल हास्टेनबर्ग याच्याशी टी-शर्टची अदलाबदली करून करोनाविषयीच्या नियमांचे उल्लंघन  केल्याप्रकरणी पॅरिस सेंट जर्मेनचा प्रमुख खेळाडू नेयमारला पुढील १२ दिवस विलगीकरणात राहावे लागणार आहे. त्यामुळे चॅम्पियन्स लीगच्या अंतिम सामन्यात त्याच्यावर बंदीची कारवाई होऊ शकते.