लंडन : फुटबॉल विश्वात प्रतिष्ठेचे स्थान असलेल्या चॅम्पियन्स लीगचा यंदाचा हंगाम आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. त्यामुळे बुधवारी मध्यरात्री होणाऱ्या उपांत्य फेरीच्या दुसऱ्या टप्प्यातील लढतीत रेयाल माद्रिद आणि चेल्सी यांच्यापैकी कोण बाजी मारणार, याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.

उभय संघांत गेल्या आठवडय़ात झालेल्या पहिल्या उपांत्य लढतीत घरच्या मैदानावर खेळणाऱ्या रेयालने चेल्सीला १-१ असे बरोबरीत रोखले. परंतु प्रतिस्पर्धी संघाच्या मैदानावर गोल केल्यामुळे चेल्सीचा आत्मविश्वास उंचावला आहे. त्यामुळे रेयालला नमवून २६ मे रोजी होणाऱ्या अंतिम सामन्यातील स्थान निश्चित करण्यासाठी चेल्सी उत्सुक आहे.

चेल्सीसाठी ऑलिव्हर जिरूडने चॅम्पियन्स लीगमध्ये आतापर्यंत सर्वाधिक सहा गोल केले असून त्याच्याव्यतिरिक्त थियागो सिल्व्हा, टिमो वर्नर आणि एन्गोलो काँटे यांच्यावर चेल्सीची भिस्त आहे. तर दुसरीकडे करीम बेन्झेमा सहा गोलसह रेयालच्या आक्रमणाची धुरा वाहत असून मधल्या फळीत टॉनी क्रूस, लुका मॉड्रिच यांची त्याला साथ लाभत आहे. कर्णधार सर्जिओ रामोस परतण्याची शक्यता असल्याने रेयालची चिंता कमी झाली आहे.

’ वेळ : मध्यरात्री १२.३० वा.

’ थेट प्रक्षेपण : सोनी टेन २, ३