चॅम्पियन्स करंडकामध्ये त्यांना एकाही संघाला पराभूत करता आले नव्हते.. अव्वल खेळाच्या जोरावर त्यांनी आपल्या शिरपेचात जेतेपदाचा तुरा खोवला.. त्यांचा हा यशाचा अश्वमेध कॅरेबियन बेटांवर दाखल झाला असून आता ही स्पर्धा जिंकण्याचा त्यांचा ध्यास असेल. तिरंगी स्पर्धेत भारताचा संघ सलामीच्या लढतीत यजमान वेस्ट इंडिजशी दोन हात करणार आहे. विजयाच्या बोहनीसह विजेतेपदाची माळही गळ्यात पडावी, हेच भारताचे ध्येय असेल.
चॅम्पियन्स करंडकावर आपले नाव कोरलेला भारतीय संघ सध्या जबरदस्त फॉर्मात आहे. फलंदाजीमध्ये शिखर धवनने चॅम्पियन्स करंडकामध्ये धावांची टांकसाळच उघडली होती. स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कारही त्याने पटकावला होता. त्याचबरोबर रवींद्र जडेजाने आपली अष्टपैलू चमक दाखवत उपयुक्त धावा केल्याच, पण त्याचबरोबर सर्वाधिक १२ बळीही मिळवले. फलंदाजीमध्ये धवनबरोबर विराट कोहली आणि रोहित शर्माही चांगल्या फॉर्ममध्ये आहेत. कर्णधार धोनी आणि सुरेश रैना यांना मात्र कामगिरीत सातत्य दाखवता आलेले नाही. पण या स्पर्धेत रैनाचे क्षेत्ररक्षण हे वाखाणण्याजोगे असेच होते. त्याचबरोबर धोनीच्या ‘मिडास टच’चा प्रत्ययही पुन्हा एकदा आला. गोलंदाजीमध्ये रवींद्र जडेजाला आर. अश्विनची चांगली साथ मिळत आहे. भुवनेश्वर कुमार हा एक गुणी मध्यमगती गोलंदाज भारताला मिळालेला आहे, चॅम्पियन्स करंडकातले त्याचे पहिले ‘स्पेल’ भन्नाट राहिले होते. त्याचबरोबर इशांत शर्माही चांगल्या फॉर्ममध्ये असून उमेश यादव मात्र दुर्दैवी ठरलेला पाहायला मिळाला.
वेस्ट इंडिजच्या संघात ख्रिस गेल नावाचे वादळ आहे तोपर्यंत त्याला कसहीली भीती नसते. श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात गेलने शतक झळकावत आपण काय चीज आहोत, याची चुणूक दाखवली आहे. गोलंदाजीमध्ये रवी रामपॉल आणि सुनील नरीन जबरदस्त फॉर्मात आहेत. कर्णधार ड्वेन ब्राव्होकडून संघाला नक्कीच मोठय़ा अपेक्षा असतील.
थेट प्रक्षेपण : टेन क्रिकेट
वेळ : रात्री ८ वा.पासून.

गेलच्या झंझावातापुढे श्रीलंका पराभूत
ख्रिस गेलच्या दणकेबाज शतकी खेळाच्या जोरावर तिरंगी एकदिवसीय स्पर्धेत विजयी सलामी दिली. श्रीलंकेने महेला जयवर्धने आणि कर्णधार अँजेलो मॅथ्यूज यांच्या अर्धशतकी खेळींच्या जोरावर वेस्ट इंडिजपुढे २०९ धावांचे आव्हान ठेवले होते. गेलच्या शतकाच्या जोरावर वेस्ट इंडिजने हा सामना सहा विकेट्स आणि १२.१ षटके राखून सहजपणे जिंकला.
गेलने श्रीलंकेच्या गोलंदाजांचा खरपूस समाचार घेत ९ चौकार आणि सात चौकारांच्या जोरावर १०९ धावांची खणखणीत शतकी खेळी साकारत संघाला विजयाचे माप ओलांडून दिले.