इंग्लंडच्या मोठय़ा धावसंख्येचा पिच्छा पुरवताना कुमार संगकाराने नाबाद १३४ धावांची धडाकेबाज खेळी साकारली. त्यामुळेच श्रीलंकेने सात विकेट राखून दणदणीत विजय मिळवला आणि चॅम्पियन्स करंडकाच्या उपांत्य फेरीत पोहोचण्याच्या आशा जिवंत राखल्या.
संगकाराने १३५ चेंडूंत १२ चौकारांच्या सहाय्याने आपली शानदार खेळी साकारली. त्यामुळे ‘अ’ गटातील श्रीलंकेला १७ चेंडू शिल्लक असतानाच आवश्यक असलेला विजय मिळाला. सलामीवीर कुशल परेरा (६) तिसऱ्याच षटकात तंबूत परतल्यानंतर संगकाराने श्रीलंकेला विजयापर्यंत नेताना तीन महत्त्वाच्या भागीदाऱ्या रचल्या. त्याने सलामीवीर तिलकरत्ने दिलशान (४४)सोबत दुसऱ्या विकेटसाठी ९२ धावांची, महेला जयवर्धने (४२) सोबत तिसऱ्या विकेटसाठी ८५ धावांची आणि न्यूवान कुलसेकरा (नाबाद ५८) सोबत चौथ्या विकेटसाठी नाबाद ११० धावांची भागीदार रचली.
संक्षिप्त धावफलक
इंग्लंड : ५० षटकांत ७ बाद २९३ (अ‍ॅलिस्टर कुक ५९, जोनाथन ट्रॉट ७६, जो रूट ६८, रवी बोपारा ३३; लसिथ मलिंगा २/५८, शमिंदा ईरंगा २/८०) पराभूत वि. श्रीलंका : ४७.१ षटकांत ३ बाद २९७ (तिलकरत्ने दिलशान ४४, कुमार संगकारा नाबाद १३४, महेला जयवर्धने ४२, न्यूवान कुलसेकरा नाबाद ५८; जेम्स अँडरसन २/५८)
सामनावीर : कुमार संगकारा