चॅम्पियन्स ट्रॉफीतील भारत विरूद्ध पाकिस्तान यांच्यातील सामन्याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. माध्यमांमध्ये या हाय व्होल्टेज सामन्याचे कव्हरेज करण्यासाठी स्पर्धा लागली असताना दुसरीकडे मात्र झी न्यूज समूहाने आज (रविवारी) होणाऱ्या भारत-पाक सामन्याचे कोणतेही वृत्त न दाखवण्याचा निर्णय घेतला आहे. झी न्यूजच्या कोणत्याही वाहिनीवर या सामन्याचे वृत्त दाखवण्यात येणार नाही. समूहाचे अध्यक्ष सुभाष चंद्रा यांनी ट्विट करून याची माहिती दिली. झी समूह आज भारत-पाक सामन्याऐवजी देशासाठी लढणाऱ्या खऱ्या नायकांची कहाणी दाखवणार असल्याचे ते म्हणाले.

 

झी न्यूज, झी हिंदुस्तान, वियोन, डीएनएबरोबरच झी न्यूजचे कोणतेही माध्यम भारत-पाकिस्तान सामन्याशी निगडीत कोणतेही वृत्त देणार नसल्याचे ट्विट चंद्रा यांनी केले आहे. चॅम्पियन ट्रॉफीशी निगडीत वृत्त त्यांच्या वाहिन्यांवर आणि वेबसाइटवर असेल. पण भारत-पाक सामन्याचे एकही वृत्त नसणार याची काळजी घेतली जाईल, असे त्यांनी म्हटले आहे.

मागील काही दिवसांपासून जम्मू काश्मीरमध्ये होत असलेल्या घुसखोरीचा उल्लेख त्यांनी केला आहे. सीमेपलीकडून होणारी घुसखोरी रोखण्यात अपयश आल्यास उरीसारखा हल्ला पुन्हा होऊ शकतो.

यासाठी झी न्यूजने एक व्हिडिओही तयार केला आहे. यामध्ये एक मुलगा खेळण्यासाठी येतो आणि अचानक चेंडूऐवजी त्याच्यावर दगडांचा वर्षाव होण्यास सुरूवात होते. याउपरही तो मुलगा म्हणतो, चल मित्रा खेळूयात. या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांनी सध्या जम्मू काश्मीरमध्ये पाकिस्तानपुरस्कृत दगडफेकीचा संदर्भ देण्यात आला आहे. दहशतवादी हल्ल्यांना, घुसखोरांना प्रोत्साहन देणे हे प्रकार सुरू असतानाही भारत त्यांच्याबरोबर खेळण्यास तयार होतो, असे त्यांनी म्हटले.