जागतिक रौप्यपदक विजेत्या नेदरलँड्सविरुद्ध शानदार विजय मिळविणारा भारतीय संघ येथे चॅम्पियन्स हॉकी स्पर्धेत बेल्जियमविरुद्धही विजयाची मालिका कायम ठेवेल, अशी अपेक्षा आहे. या दोन संघांमधील उपांत्यपूर्व फेरीचा सामना गुरुवारी होणार आहे.
आठ देशांच्या या स्पर्धेत भारताला पहिल्या दोन साखळी सामन्यांमध्ये अपेक्षेइतकी चांगली कामगिरी करता आली नव्हती. त्यांना जर्मनी व अर्जेटिना यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला होता. या दोन्ही सामन्यांमध्ये बचाव फळीतील खराब कामगिरीमुळेच भारतास पराभव स्वीकारावा लागला होता. मात्र त्यानंतर भारताने बलाढय़ डच संघावर मात करताना चतुरस्र खेळाचा प्रत्यय घडविला. सरदारा सिंगच्या नेतृत्वाखाली भारतीय खेळाडूंनी धारदार आक्रमण व चांगला बचाव करीत हा सामना जिंकला. बेल्जियमने या स्पर्धेत एक सामना जिंकला व दोन बरोबरीत सोडवले आहेत. त्यांनी अपराजित्व राखले असले तरी बाद फेरीच्या सामन्यात वेगळीच रणनीती उपयोगात आणावी लागते. त्यामुळेच भारताविरुद्ध खेळताना ते गाफील राहणार नाहीत.