भारत-पाकिस्तान.. जागतिक नकाशावरील ही भौगोलिकदृष्टय़ा ‘शेजारी-शेजारी’ राष्ट्रे.. जेव्हा-जेव्हा हे दोन संघ एकमेकांसमोर कोणत्याही खेळात आमने-सामने उभे ठाकतात, तेव्हा त्या सामन्याला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त होते.. आशा-निराशेचे हिंदोळे, भावनिकता, उत्कंठा हे सारे भाव त्या सामन्याशी जुळतात.. दोन्ही देशांचे क्रिकेटवर निस्सीम प्रेम.. शनिवारी हे ‘पक्के शेजारी’ साता समुद्रापार इंग्लंडच्या भूमीवर चॅम्पियन्सचा सामना खेळणार आहेत.. या सामन्याच्या जय-पराजयाने तसा दोन्ही संघांना फरक पडणार नाही.. परंतु तरीही परंपरागत प्रतिस्पध्र्यामधील प्रतिष्ठा या सामन्याच्या निमित्ताने नक्कीच डावावर असेल.
एजबस्टन मैदानावर हा ‘ब’ गटामधील अखेरचा साखळी सामना होणार आहे. भारताने आधीच आपले उपान्त्य फेरीतील स्थान निश्चित केल्यामुळे या विजयानिशी (सहा गुणांसह) ते रुबाबात वाटचाल करू शकतील. चॅम्पियन्स करंडकाची तिकिटे ऑनलाइन विक्रीसाठी ठेवण्यात आली तेव्हा भारत-पाकिस्तानच्या सामन्याला सर्वाधिक प्रतिसाद लाभला होता. इंग्लंडमध्ये या दोन्ही देशांचे अनेक चाहते असल्यामुळे स्वाभाविकपणे शनिवारच्या सामन्याला गर्दीप्रमाणेच दर्दी क्रिकेटरसिकसुद्धा पाहायला मिळतील.
बर्मिगहॅम हे इंग्लंडमधील लंडननंतरचे दुसऱ्या क्रमांकाचे शहर. आशियाई नागरिक या शहरात मोठय़ा प्रमाणात वास्तव्य करतात. २५ हजार क्षमतेच्या या स्टेडियमवर ९० टक्के क्रिकेटरसिक शनिवारी भारत किंवा पाकिस्तानचे समर्थक म्हणून दिसतील.
भारतीय संघ या स्पध्रेत आवेशपूर्ण कामगिरी करीत आहे, तर पाकिस्तानची कामगिरी फारशी समाधानकारक होताना दिसत नाही. परंतु पाकिस्तानचा संघ हा अतिशय धोकादायक मानला जातो. वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या खराब कामगिरीमुळे पाकिस्तानचे आव्हान संपुष्टात आले आहे. परंतु तरी विश्वविजेत्या आणि जागतिक एकदिवसीय क्रमवारीतील अव्वल स्थानावरील भारताशी ते ताकदीने टक्कर देऊ शकतात. याचे आणखी एक कारण म्हणजे चॅम्पियन्स करंडकाचा इतिहास पाकिस्तानसोबत (२-०) आहे. ते आतापर्यंत भारताकडून कधीच हरलेले नाहीत.
सप्टेंबर २००४मध्ये एजबस्टन याच मैदानावर पाकिस्तानने भारताला हवले होते. भारताचे २०१ धावांचे तुटपुंजे आव्हान पेलतानाही रंगतदार लढतीचा आनंद क्रिकेटरसिकांना मिळाला होता. नाबाद ८१ धावा काढणारा मोहम्मद युसूफ विजयाचा शिल्पकार ठरला. त्यामुळेच पाकिस्तानने चार चेंडू आणि तीन विकेट्स राखून विजय मिळवला. त्यानंतर २००९मध्ये सेंच्युरियनच्या सुपरस्पोर्ट पार्कवर पाकिस्तानने ५४ धावांनी विजय मिळवला. त्या सामन्यात शोएब मलिकने १२८ धावांची यादगार खेळी साकारली होती.
कार्डिफ येथे दक्षिण आफ्रिकेला नमवून भारताने यंदाच्या चॅम्पियन्स करंडकाचा श्रीगणेशा केला. शनिवारच्या सामन्यानंतर भारतीय संघ कार्डिफला उपान्त्य सामन्यासाठी प्रस्थान करेल. ‘अ’ गटातील द्वितीय स्थानावरील संघाशी भारताची गाठ पडेल.
आतापर्यंतच्या सामन्यांप्रमाणेच पाकिस्तानी गोलंदाज आणि भारतीय फलंदाज यांच्यातील अव्वल लढत क्रिकेटरसिकांना पाहायला मिळणार आहे. एजबस्टनला बुधवारी आणि गुरुवारी पाऊस पडला होता. सूर्याचा लपंडावही सुरू आहे. मोठी धावसंख्या उभारण्यासाठी वातावरण अनुकूल मुळीच नाही. परंतु भारताने इंग्लिश भूमीवरील चार सामन्यांपैकी तीनदा (दोनदा सराव सामन्यांमध्ये) तीनशेचा टप्पा ओलांडला आहे. या पाश्र्वभूमीवर नाणेफेकीचा कौल महत्त्वाचा ठरणार आहे.
फलंदाजी हा पाकिस्तानसाठी चिंतेचा विषय ठरत आहे. आघाडीची आणि मधली फळी या स्पध्रेत स्थिरावू शकलेली नाही. सलामीवीर नासिर जमशेद आणि कर्णधार मिसबाह-उल-हकशिवाय एकाही फलंदाजाला इंग्लिश वातावरणात आत्मविश्वासाने फलंदाजी करता आलेली नाही. मोहम्मद हाफीझ आणि शोएब मलिकचा फॉर्म पाकिस्तानसाठी महत्त्वाचा आहे.
भारताची फलंदाजीची ताकद म्हणजे त्यांची सलामीवीर जोडी रोहित शर्मा आणि शिखर धवन ही आहे. दोन्ही सामन्यांत भारताच्या विजयाचा पाया याच जोडीने रचला. दक्षिण आफ्रिकेच्या दर्जेदार वेगवान माऱ्याचाही त्यांनी त्वेषाने सामना केला. फॉर्मात असलेल्या धवनने दोन सलग शतके झळकावली आहेत.
प्रतिस्पर्धी संघ –
भारत : महेंद्रसिंग धोनी (कर्णधार), आर. अश्विन, शिखर धवन, रवींद्र जडेजा, दिनेश कार्तिक, विराट कोहली, भुवनेश्वर कुमार, अमित मिश्रा, इरफान पठाण, सुरेश रैना, इशांत शर्मा, रोहित शर्मा, मुरली विजय, विनय कुमार आणि उमेश यादव.
पाकिस्तान : मिसबाह-उल-हक (कर्णधार), नासिर जमशेद, मोहम्मद हाफीझ, इम्रान फरहत, कमरान अकमल, शोएब मलिक, असद शफिक, सईद अजमल, जुनैद खान, मोहम्मद इरफान, असद अली, वहाब रियाझ, उमर अमिन, अब्दुल रेहमान आणि एहसान अदिल.
सामन्याची वेळ : दुपारी ३ वाजल्यापासून.
थेट प्रक्षेपण : स्टार क्रिकेट, स्टार स्पोर्ट्स-२

भारत-पाकिस्तान हा सामना नेहमीच महत्त्वाचा असतो. या दोन देशांमधील प्रत्येक सामन्याला क्रिकेटरसिकांचा तुफानी प्रतिसाद लाभतो. या दोन संघांमधील सराव सामन्याला लोक गर्दी करतात. शनिवारच्या सामन्यालाही असाच उदंड प्रतिसाद लाभो. आमची कामगिरी सातत्यपूर्ण होत आहे.
-महेंद्रसिंग धोनी, भारताचा कर्णधार

आमच्यासाठी हा अंतिम सामनाच आहे. विश्वविजेत्या भारतावर विजय मिळविल्यास किमान क्रिकेट चाहत्यांना आनंद देता येईल. आमचे आव्हान संपुष्टात आले आहे, याची आम्हाला कल्पना आहे. परंतु मी माझ्या संघसहकाऱ्यांना सांगितले की, प्रत्येक सामना हा स्वत:ला सिद्ध करण्यासाठीचा शेवटचा सामना असतो, अशा पद्धतीने खेळाकडे पाहा! -मिसबाह-उल-हक, पाकिस्तानचा कर्णधार