गेल्या काही दिवसांपासून भारत आणि पाकिस्तान यांच्यात सीमारेषेवर तणावाची स्थिती असल्याचे दिसून येत आहे. हीच परिस्थिती क्रिकेटच्या मैदानावरही कायम असल्याचे दिसते. आयसीसीच्या चॅम्पियन्स ट्रॉफीत रविवारी भारत आणि पाकिस्तान हे पारंपारिक प्रतिस्पर्धी एकमेकांविरोधात भिडणार आहेत. मैदानावरील सामन्यापूर्वीच मैदानाबाहेर दोन्ही देशाच्या माजी खेळाडूंच्या शाब्दिक युद्धास सुरूवात केली आहे. एका वृत्त वाहिनीवर प्रतिस्पर्धी गोलंदाजांचा नेहमी कर्दनकाळ ठरलेला टीम इंडियाचा माजी खेळाडू वीरेंद्र सेहवाग आणि आपल्या वेगाने फलंदाजांना पळता भुई थोडी करणारा पाकचा गोलंदाज शोएब अख्तर यांच्यातील शाब्दिक धुमाऱ्यांनी रविवारचा सामना आणखी रंगतदार होणार याची प्रचिती येण्यास सुरूवात झाली आहे. साहजिकच इथेही सेहवागच शोएब अख्तरवर वरचढ ठरला. रविवारच्या सामन्यानंतर भारताकडून पराभूत झाल्यानंतर पाकिस्तानी चाहत्यांनो टीव्ही फोडू नये. त्यापेक्षा रेडिओ स्वस्त असतो, तो खरेदी करा, असा सल्ला सेहवागने अख्तरला दिला. सेहवागच्या या शाब्दिक फटकाऱ्यासमोर गलितगात्र झालेल्या अख्तरला सुरूवातीला काय उत्तर द्यावे हे सुचले नाही. नंतर त्याने स्वत:ला सावरत आमच्याकडे खराब झालेले चीनचे जुने टीव्ही खूप आहेत त्यामुळे आम्ही ते फोडतो, असे म्हणत सेहवागला उत्तर देण्याचा प्रयत्न केला. पाकिस्तान हे एक वांगं आहे. त्याचं भारताकडून भरीत केलं जाईल, असेही त्याने या वेळी म्हटले.

परंतु, एवढ्यावरच थांबणारा तो सेहवाग कुठला. त्याने प्रत्येकवेळी अख्तरला फटकारले. भारताकडून नेहमीप्रमाणे पाकिस्तानचे वांग्याचे भरीत होणार असल्याचा सणसणीत टोला लगावला. कोणत्याही परिस्थिती पाकिस्तान भारताला तर पराभूत करेलच त्याचबरोबर चॅम्पियन्स ट्रॉफीही घेऊन येईल आणि चाहत्यांना जल्लोष करण्याची संधी मिळेल, असा आत्मविश्वास अख्तरने बोलून दाखवला. त्यावेळी सेहवागने अख्तरची फिरकी घेत. भारत जल्लोष साजरा करणार यांत शंका नाहीच. उलट पाकिस्तानने टीव्ही फोडण्यापेक्षा रेडिओ घ्यावा असा उपहासात्मक टोला लगावत त्याने विश्वचषक आणि चॅम्पियन्स ट्रॉफीत पाकिस्तानचा कसा पराभव केला याची आकडेवारीच सांगितली.

अख्तरने भारत आणि पाकिस्तान दरम्यान दरवर्षी २ मालिका व्हाव्यात. त्याचा फायदा भारताला अधिक होईल, असे म्हटले. त्यावरही सेहवागने त्याची खिल्ली उडवली. बीसीसीआय ही जगातील सर्वांत श्रीमंत क्रिकेट संघटना असून त्यांना अशा मालिकांची गरज नाही. टरबूजमध्ये जेवढ्या बिया असतात तेवढ्या पाकिस्तानमध्ये अडचणी आहेत, असा टोलाही लगावला. तसेच हे कलियुग नव्हे तर ‘कोहली’युग असल्याचा इशारा त्याने अख्तरला दिला.शेवटी सेहवागने शोएबची चांगलीच खेचली असं म्हणावं लागेल