जागतिक हॉकी लीग स्पर्धा ही भारतीय हॉकीपटूंना वर्चस्व मिळविण्यासाठी सुवर्णसंधी असली तरी केव्हाही कोणताही प्रतिस्पर्धी डोईजड होऊ शकतो. हे लक्षात घेऊनच भारतीय खेळाडूंना गाफील राहून चालणार नाही हे मत व्यक्त केले आहे भारतीय हॉकी संघाचे प्रशिक्षक मायकेल नॉब्ज यांनी.
जागतिक हॉकी लीग स्पर्धेला सोमवारपासून नवी दिल्लीत सुरुवात होत आहे. या स्पर्धेत विजेतेपद मिळविण्यासाठी हुकमी संघ म्हणून भारताकडे पाहिले जात आहे. पुढील वर्षी होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेसाठी ही स्पर्धा पात्रता फेरी असल्यामुळे भारतासाठी त्यास अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. या स्पर्धेतील संभाव्य लढतींविषयी नॉब्ज यांनी ‘लोकसत्ता’ प्रतिनिधीशी मनमोकळेपणाने संवाद साधला.
जागतिक लीगमध्ये भारताकडे संभाव्य विजेता संघ म्हणून पाहिले जात आहे. त्याविषयी तुमचे काय मत आहे?
आमचा संघ संभाव्य विजेता मानला जात आहे. आम्हास घरचे अनुकूल मैदान, स्थानिक प्रेक्षकांचा पाठिंबा व अनुकूल वातावरण याचा फायदा मिळणार आहे. मात्र हॉकीत एखादी किरकोळ चूकही सामन्यास कलाटणी देऊ शकते. त्यामुळेच मी आमच्या खेळाडूंना गाफील राहू नये असे सतत सांगत आलो आहे. विजेतेपद मिळविण्याच्या क्षमतेइतका खेळ त्यांनी केला तर एकतर्फी विजेतेपद जिंकता येईल.
या स्पर्धेत भारतास कोणत्या संघाकडून चांगली लढत मिळेल असे तुम्हास वाटते?
आर्यलड व चीन यांच्याकडून आमच्या खेळाडूंना चांगली लढत मिळण्याची शक्यता आहे. आर्यलडचे खेळाडू मॅन टू मॅन पद्धतीने खेळतात. त्यांची ही शैली काही वेळा धोकादायक ठरू शकते. त्यांच्याविरुद्ध आम्हाला बचावात्मक खेळावर लक्ष केंद्रित करावे लागणार आहे. चीनचे खेळाडू जिगरबाज खेळ करण्याबाबत ख्यातनाम आहेत. सामन्यास कलाटणी देण्याची क्षमता त्यांच्याकडे आहे हे ओळखूनच आम्हास थोडासा सावध दृष्टिकोन ठेवावा लागणार आहे.
भारताचा कर्णधार सरदारासिंग याने आमची गोलरक्षकाची बाजू कमकुवत असल्याचे मत व्यक्त केले होते. तुम्हास तसे वाटते काय?
सरदारा सिंग याच्या मताशी मी पूर्णपणे सहमत नाही. गोलरक्षक पी.आर.प्रीजेश व पी.टी.राव हे दोघेही अनुभवी गोलरक्षक आहेत. हॉकी इंडिया लीगमध्ये त्यांची कामगिरी अपेक्षेइतकी झाली नाही ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही. मात्र सध्या हेच दोन चांगले गोलरक्षण करू शकतात असे माझे मत आहे. अर्थात मी हॉकी इंडिया लीगनंतर सराव सत्रात त्यांना चुका काय होतात हे सांगितले आहे आणि मला आशा आहे की या चुका टाळण्याचा त्यांचा प्रयत्न राहील.
अनेक वेळा तुम्ही दिलेल्या सूचनांपेक्षा आपले खेळाडू वैयक्तिक तंत्रानुसार खेळतात. याबाबत तुम्हाला काय वाटते?
ऑलिम्पिक स्पर्धेच्या वेळी असा अनुभव मला आला होता. मी खूप शिकविले असले तरी खेळाडू ऐनवेळी स्वत:स पाहिजे तसाच खेळ करतात. अर्थात असा खेळ करणाऱ्या खेळाडूंना मी ऑलिम्पिकनंतर संघात स्थान दिलेले नाही. हॉकी हा काही वैयक्तिक खेळ नाही. सामन्याचे यश सांघिक समन्वयाच्या जोरावरच अवलंबून असते. आक्रमक फळीतील खेळाडूंना मधल्या फळीतील खेळाडूंनी योग्य रीतीने पासेस दिले नाही तर मी केलेले नियोजन कोलमडते. या स्पर्धेतून विश्वचषक स्पर्धेची पात्रता सिद्ध करायची असल्यामुळे तशा चुका यावेळी आमचे खेळाडू करणार नाहीत अशी अपेक्षा आहे.
हॉकी इंडिया लीग भारतीय खेळाडूंना आणि भारतास कितपत फायदेशीर ठरली आहे?
हॉकी हा खेळ तळागाळापर्यंत पोहोचल्याशिवाय भारतास आंतरराष्ट्रीय स्तरावर अव्वल दर्जाचे यश मिळविता येणार नाही. त्याकरिता हॉकी इंडिया लीगसारख्या स्पर्धा निश्चितच देशास उपयोगी पडणार आहेत. तसेच आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघापुढे आपली प्रतिष्ठा उंचावण्यासाठी भारतास ही स्पर्धा उपयोगी पडणार आहे. या स्पर्धेद्वारे मनदीपसिंग व मलकसिंग यांच्यासारखे गुणवान खेळाडू आमच्या संघास मिळाले आहेत. आणखीही काही युवा खेळाडूंचा खेळ नजरेत भरण्यासारखा झाला आहे. त्यांनाही भारतीय संघात योग्यवेळी संधी दिली जाईल. संघातून वगळलेल्या खेळाडूंना अशा स्पर्धाद्वारे आत्मपरीक्षणाची संधी मिळाली आहे. ते या स्पर्धेतून बोध घेत आपली कामगिरी सुधारण्यासाठी प्रयत्न करतील अशी मला खात्री आहे.